पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरात आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. लालूंचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यातच पाटणा सिव्हिल कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. मला ऐश्वर्यासोबत राहायचं नाही, असं त्यांनी अर्जात म्हटलं आहे.


कोर्टाने तेजप्रताप यादव यांचा अर्ज मंजूर केला आहे. घटस्फोटाच्या अर्जाचा केस नंबर 1208 आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात 29 नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचं सहा महिन्यांपूर्वी 12 मे, 2018 रोजी ऐश्वर्या रायसोबत विवाह झाला होता. ऐश्वर्या राय ही माजी मुख्यमंत्री दारोगा राय यांची नात असून तिचे वडील चंद्रिका राय राजदचे आमदार आहे. शिवाय ते मंत्रीही होते.

ऐश्वर्याने दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. तर अमेठी विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. 18 एप्रिल 2018 रोजी तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्याला लालू यादव उपस्थित नव्हते, कारण त्यावेळी एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

लालू यादव यांना नऊ अपत्य असून त्यात सात मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. सातही मुलींचं लग्न झालं असून तेज प्रताप, लालू यादव यांचे मोठे पुत्र आहेत. शिवाय आघाडीच्या नितीश सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते.