मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले, आम्ही सगळे फसलो, आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदींना सूर्यावरती पाठवावं, त्यांचं नाव जगभर होऊ दे अशी मिश्किल टिप्पणी राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केली. आम्ही घाबरणार नाही, मोदींना सत्तेतून हटवूनच शांत बसणार असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. 


विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी संबोधन करताना लालूप्रसाद यादव म्हणाले की, मोदींनी अफवा पसरून सत्ता प्राप्त केली. मोदी म्हणाले सत्तेत आल्यानंतर स्वीस बँकेचा पैसा परत आणतो आणि लोकांच्या खात्यामध्ये पाच पाच लाख रुपये देतो. आम्ही पण फसलो आणि बँकेत अकाऊंट उघडलं. पण अजून आमच्या खात्यात काहीच जमा झालं नाही. देशात इतकी गरीबी असताना हे म्हणतात की देशाचा विकास होतोय. इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनी देशाचं नाव मोठं केलं. चांद्रयान चंद्रावर पाठवलं. आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदींना सूर्यावर पाठवावं. 


या आधी आम्ही एक नव्हतो, त्याचा फायदा हा मोदींनी घेतला आणि सत्तेत आले. आता देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून मोदींनी सत्तेतून घालवूनच आम्ही शांत बसणार असं ते म्हणाले. ते म्हणाले की, भाजपा हटावो आणि देश बचाओ यासाठी आम्ही सुरवात केली आहे. देशातील अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. महागाई वाढली आहे. टोमॅटोची काय परिस्थिती आहे माहित आहे. 


शरद पवारांना शुभेच्छा


लालूप्रसाद यादव यांनी भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी लढत राहावं, ते जुने नेते आहेत, आम्ही त्यांच्या पाठिशी आहे असंही ते म्हणाले. 


लालूप्रसाद यादव यांच्या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, देशात फक्त काही उद्योगपतींसाठी धोरणं लागू केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानींची चौकशी करावी. लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली असून त्यावर भाष्ट करावं. 


राहुल गांधी म्हणाले की, इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आता यासंबंधित जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच तयार करण्यात येईल. त्यासाठी एक समन्वय समिती निर्माण करण्यात आली आहे. 


ही बातमी वाचा: