Maharashtra Election Updates: एक देश, एक निवडणूक (One Nation One Election) निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून समितीनं यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी वन नेशन वन इलेक्शन विधेयकाबाबतच्या चर्चांना साकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच, या निर्णयामुळे निवडणुकांवर होणारा खर्चही वाचेल, त्याचप्रणाणे 'वन नेशन, वन इलेक्शन'मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मांडलेली 'वन नेशन, वन इलेक्शन' भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्यानं कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो." तसेच, "वन नेशन, वन इलेक्शन'मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं आता पुढाकार घेतलेल्या 'वन नेशन, वन इलेक्शन' भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावं. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे.", अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन' भूमिकेचं समर्थन केलं आहे.
'वन नेशन, वन इलेक्शन'चं समर्थन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं ते धाडस दाखविलं आहे. देशातील अनेक राज्यात सातत्यानं होत असलेल्या निवडणुकांमुळे शासन, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा वारेमाप खर्च होतो. सतत निवडणुका झाल्यानं त्या कामात प्रशासनाचा मौलिक वेळ वाया जातो. त्याचा विकासकामांना फटका बसतो."
'वन नेशन, वन इलेक्शन' ही आवश्यक बाब होती. ती भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी मांडली होती. तिला मूर्त स्वरूप देण्याची वेळ आता आली आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल. यापूर्वी 'वन नेशन, वन टॅक्स' हा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्व राज्यांच्या सहमतीने अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर 'वन नेशन, वन इलेक्शन' ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल, हा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष 'वन नेशन, वन इलेक्शन' भूमिकेचं स्वागत करतो, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.