Lakhimpur Kheri Case : केंद्रीय गृह राज्यमंत्री  अजय मिश्रा यांचा मुलगा आणि लखीमपूर खेरी  हिंसाचारातील (Lakhimpur Kheri Violence) मुख्य आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) याने अखेर न्यायालयात शरणागती पत्करली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राचा जामीन फेटाळला होता. तसेच, त्याला आठवडाभरात न्यायालयाला शरण येण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आशिष मिश्रा याने आज दंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले.


आशिष मिश्राचा याचा सोमवारी जामीन रद्द करण्यात आला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एक आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या मुदतीचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यापूर्वीच आज आशिष मिश्रा याने न्यायालयात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.   


उत्तर प्रदेशधील लखीमपूर खेरी येथील शेतकर्‍यांना चिरडल्याचा आरोप आशिष मिश्रावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एसआयटीने त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आणि जामिनाला विरोध केला. मात्र, चार महिने तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी आशिष मिश्राला उच्च न्यायालयाकडून काही अटींसह जामीन मिळाला होता. त्यानंतर  उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.


याप्रकरणी गंभीर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उच्च न्यायालयाने जखमींची बाजू कशी पाहिली, याची आम्हाला चिंता आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आणि 18 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना आशिष मिश्रा याचा जामीन फेटाळला आणि त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.


लखीमपुरात काय झालं होतं?


केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.