नवी दिल्ली : हातरसमध्ये आम्ही सरकारवर दबाव टाकला म्हणून सरकारने कारवाई केली. आताही आम्ही लखीमपूर खेरी प्रकरणात सरकारवर दबाव टाकणार आहोत. या प्रकरणातील आरोपीवर कारवाई केली जावी ही आमची मागणी असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. त्याचसाठी कलम 144 चा भंग न करता आज दोन सहकाऱ्यांसोबत लखीमपूर खेरीमध्ये आपण जाणार असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. 


लखीमपूर खेरीमध्ये कलम 144 लागू केलं असल्यामुळे पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येत नाही. काल राहुल गांधी यांना लखीमपूर खेरीला जाताना प्रशासनाने रोखलं होतं. त्यामुळे राहुल गांधी आता दोन सहकाऱ्यांसोबत लखीमपूर खेरीला जाणार आहेत. तिघांनी त्या ठिकाणी जायला या कायद्याअन्वये गुन्हा नसल्याचं सांगत तशा प्रकारचं पत्र प्रशासनाला दिलं असल्याचं राहुल गांधी म्हणाले


लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी चालवून त्यांना चिरडलं होतं. त्यामध्ये आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपीवर कारवाई करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरी या ठिकाणी कलम 144 लागू केलं आहे. 


काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "देशात शेतकऱ्यांची हत्या होतेय, शेतकरी विरोधी कृती केली जाते. आज भारतामध्ये लोकशाही नसून हुकुमशाही आहे. राजकारणी उत्तर प्रदेशात जाऊ शकत नाहीत. देशात मोठी चोरी केली जात आहे. ती लपवण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जात आहेत."


काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना म्हणाले की, "केंद्राने सुरुवातीला जमीन अधिग्रहन कायदा केला. त्यानंतर शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे केले. आता सरकार शेतकऱ्यांना मारतंय. काल पंतप्रधान लखनऊमध्ये होते. पण लखीमपूरला मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला त्यांना वेळ मिळाला नाही." 


प्रियांका गांधींना अटक
शांतता भंग करणे आणि जमावबंदीच्या 144 या कलमाचे उल्लंघन करणे या आरोपाखाली काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना सितापूर जिल्ह्यातील हरगावमधून अटक केली आहे. लखीमपूर खेरी या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रियांका गांधी या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जात होत्या. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर, आशिष मिश्रावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या दबावामुळे पोलिसांनी आशिष मिश्रावर हत्या, गैरव्यवहार, दुर्घटना करण्याचा हेतू अशा विविध आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. 


संबंधित बातम्या :