नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंपरेनुसार यंदाही तृणमूलच्या यादीत प्रसिद्ध टीव्ही-चित्रपट कलाकारांची नावं आहेत. पाच टॉलिवूड कलाकारांसह 42 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.


नुसरत जाहन, मिमी चक्रवर्ती, शताब्दी रॉय, दीपक अधिकारी यासारख्या कलाकारांना तृणमूलने तिकीट दिलं आहे. दिग्गज अभिनेत्री मून मून सेन या भाजप मंत्री आणि बॉलिवूड गायक बाबुल सुप्रियो यांना आसनसोलमध्ये टक्कर देतील. विशेष म्हणजे यादीत 41 टक्के उमेदवार महिला आहेत.

2011 मध्ये सत्तेत आल्यापासून तृणमूल काँग्रेसने सेलिब्रेटींना तिकीट देण्याची परंपरा अखंडित ठेवली आहे. लोकसभा खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते तपस पाल यांना प्रकृतीच्या कारणामुळे पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

ग्रामीण भागात कलाकारांच्या सभांना जनतेची गर्दी खेचली जाते. कलाकार प्रचार करत असलेल्या मतदारसंघासोबतच आजूबाजूच्या मतदारसंघातील मतदारही येतात, हा दुहेरी फायदा असल्याचं तृणमूलचे राज्यसभा खासदार म्हणाल्याची माहिती आहे.