नवी दिल्ली : इथिओपियातील बोईंग विमानाच्या अपघातानंतर भारतात बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) तातडीने पावलं उचलत हा निर्णय जाहीर केला.


बोईंग 737 मॅक्स 8 विमानांमधील त्रुटी दूर करुन योग्य त्या सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नसल्याचं डीजीसीएने म्हटलं आहे.

सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तूर्तास कोणती पावलं उचलता येतील, यावर चर्चा करण्याचे आदेश नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी डीजीसीएच्या सचिवांना दिले होते. प्रवाशांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब असल्याचं प्रभूंनी स्पष्ट केलं.


भारतात स्पाईसजेट आणि जेट एअरवेज या दोन कंपन्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाचा वापर करतात. त्यानंतर स्पाईसजेटने प्रवासी आणि केबिन क्रूच्या हिताच्या दृष्टीने तात्काळ बोईंग 737 8 मॅक्स विमानांचा वापर थांबवला आहे. जेट एअरवेजने अपघाताआधीच या विमानांचा वापर थांबवला होता.
इथोपियामध्ये बोईंग विमान कोसळलं, 157 प्रवासी मृत्यूमुखी, 4 भारतीयांचा समावेश

फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे या देशांनीही काल बोईंग विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला.

इथियोपियामध्ये 10 मार्चला बोईंग विमान कोसळून झालेल्या अपघातात 157 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. यामध्ये चार भारतीयांचा समावेश आहे. उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाशी संपर्क तुटला होता.