अहमदाबाद : हिंसाचाराच्या भीतीने उत्तर भारतीयांचं गुजरातमधून पलायन सुरुच आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी बातचीत केली आहे. पोलिसांकडूनही हल्लेखोरांची धरपकड सुरु असून आतापर्यंत शेकडो जणांना अटक करण्यात आली आहे.


गुजरातच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम

उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हिंसाचाराचा परिणाम गुजरातच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने याबाबत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पत्र लिहिलं आहे. परप्रांतियांवरील हल्ल्यांमुळे उत्पादन आणि व्यापारावर परिणाम झाला असल्याचं चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटलं आहे. हिंसाचारामुळे गांधीनगर, मेहसाणा, साबरकांठा, पाटण आणि अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर उत्तर भारतीयांनी घरचा रस्ता धरला आहे.

राहुल गांधींची सरकारवर टीका

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांना सरकारची चुकीची धोरणं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. ''गरीबीपेक्षा मोठी दहशत नाही. गुजरातमधील हिंसाचाराचं मूळ तेथील बंद पडलेले कारखाने आणि बेरोजगारी आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही कोलमडली आहे. कामगारांना निशाणा करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी पूर्णपणे याच्या विरोधात आहे,'' असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

हजारोंच्या संख्येने पलायन

मध्य प्रदेशातील भिंड या आपल्या गावी परतण्यासाठी बसची वाट पाहत बसलेल्या राजकुमारी जाटवने 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं, की ''माझा मुलगा घराबाहेर खेळत होता. अचानक त्याच्यावर कुणीतरी हल्ला केला. पती रंगाचं काम करुन घर चालवतात.'' तर भिंडच्या धर्मेंद्र कुशवाह यांच्या मते, यूपी, बिहार आणि मध्य प्रदेशच्या कमीत कमी 1500 लोकांनी आतापर्यंत गुजरात सोडलं आहे.

सत्यम ट्रॅव्हलसचे पिंटो सिंह यांच्या माहितीनुसार, ''मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात जाण्यासाठी गुजरातमधून दोन दिवसांनी एक बस जाते, ज्यात 25 प्रवासी असतात. पण आता एका बसमध्ये 80 ते 90 जण जात आहेत. शिवाय एका दिवसाला 20 बस भरुन जात आहेत.''

काय आहे गुजरातमधील प्रकरण?

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका बिहारच्या व्यक्तीला अटक केली आहे. घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिहारच्या रवींद्र साहू नावाच्या एका व्यक्तीला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली.

गुजरातमध्ये यूपी, बिहारींवर हल्ले, अल्पेश ठाकोर समर्थित हल्ले असल्याचा आरोप