नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सने प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. आता ते इंडिगोच्या कोणत्याही फ्लाइटने सहा महिन्यांपर्यंत प्रवास करू शकणार नाही. कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत फ्लाइटमध्ये वाद घातला. त्यामुळे त्याच्या या वागणूकीमुळे हे पाऊल उचलल्याचं, इंडिगोने ट्वीट करून सांगितलं आहे.
काय आहे हे प्रकरण?
दिल्ली ते लखनौ जाणाऱ्या फ्लाइट नंबर 6E 5317 मध्ये कुणाल कामराची भेट पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत झाली. कुणालने यादरम्यान अर्णब गोस्वामी यांच्यासोबत वाद घातला. तो सतत त्यांना प्रश्न विचारत होता. परंतु, अर्णब गोस्वामी त्याच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नव्हते. फ्लाइटमध्ये असतानाच कुणालने याबाबतचा एक व्हिडीओ तयार केला. ज्यामध्ये तो सतत अर्णब गोस्वामी यांना प्रश्न विचारत असल्याचं दिसून येत आहे. कुणालने अर्णब गोस्वामी यांच्यासाठी 'कायर' शब्दाचा वापर केल्याचं व्हिडीओमध्ये समजत आहे. हा व्हिडीओ कुणालने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केला आहे.
दुसऱ्या प्रवाशांची कुणाल कामराने मागितली होती माफी
कुणाल कामराने आणखी एक ट्वीट करत फ्लाइटमधील इतर प्रवाशांची माफी मागितली होती. ट्विटरवर कुणालने लिहिलं आहे की, 'एका व्यक्तीला सोडून इतर प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांची माफी मागतो.' दरम्यान, याचबरोबर कुणालने हेदेखील म्हटलं आहे की, त्याने काहीच चुकीचं काम केलेलं नाही.
इंडिगोने केलं ट्वीट
इंडिगोने एक ट्वीट केलं आहे की, 'मुंबईमधून लखनौला जाणाऱ्या 6E 5317 फ्लाइटमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडी पाहता आम्ही कुणाल कामराला सहा महिन्यांसाठी इंडिगोच्या फ्लाइटमधून प्रवास करण्यासाठी बंदी घालत आहोत. कारण फ्लाइटमधील त्याची वागणूक ही चूकीच्या पद्धतीची होती. त्यामुळे आम्ही आमच्या प्रवाशांना सांगू इच्छितो की, फ्लाइटमध्ये कोणत्याही व्यक्तीची बदनामी करणं टाळा. कारण यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो.'
रिपब्लिक टीव्हीचे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामी यांच्यासोबत वाद घातल्याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सने प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं असून यासंदर्भात अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. अशातच काँग्रेसने कुणाल कामरावर इंडिगोने लावलेल्या बंदीचा निषेध केला आहे. या प्रकरणी बोलताना हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंडिगोने लावलेल्या बंदीला पांठींबा देत भारतातील इतर एअरलाइन्सनेही कुणाल कामरावर बंदी घालावी असा सल्ला दिला आहे. दरम्यान याप्रकरणी स्पाइस जेटनेही कुणाल कामरावर बंदी घातली आहे.
काँग्रेस नेत्यांकडून निषेध व्यक्त
कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेल्या वादावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, 'आशा आहे की, सत्तेत असणाऱ्यांच्या इशाऱ्यावर न चालता इंडिगो-6ई उड्डानाच्या वेळी इंजिन बंद झाल्याने, इंजिनमध्ये बिघाड झाल्याने, केबिनमधील प्रेशर कमी झालं, खराब इंजिन यांसारख्या तक्रारींकडे जास्त लक्ष देईल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करणार नाही.'
तसेच याप्रकरणी काँग्रेसचे वरिष्ठ नेता शशि थरूर म्हणाले की, 'सत्य हे आहे की, कोणीतरी त्याला त्याच्याच औषधाची चव चाखयला दिली आहे. थरूर यांनी ट्वीट केलं की, 'हे तेच शब्द आहेत, ज्यांच्या वापर ते आपल्या निर्दोष पीडितांना धमकावण्यासाठी करतात. फरक फक्त एवढाच आहे की, यासर्व गोष्टी ते धमकीच्या स्वरूपात आणि मोठ्या आवाजात करतात. तेवढं कुणाल कामराने काहीच केलेलं नाही.'