कोलकाता : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन झालं. किडनीच्या आजारामुळे कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात त्यांची अखेरचा श्वास घेतला. सोमनाथ चॅटर्जी 89 वर्षांचे होते. सोमनाथ चॅटर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंरतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. अखेर आज सकाळी सव्वा आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

दहा वेळा लोकसभेचे खासदार
माकपचे नेते सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील निर्मल चंद्र चॅटर्जी यांचे पुत्र होते. निर्मल चंद्र चॅटर्जी हे हिंदू महासभेचे संस्थापक होते. सोमनाथ चॅटर्जी यांनी 1968 मध्ये माकपसह राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि 2008 पर्यंत या पक्षात कार्यरत होते. 1971 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. यानंतर राजकारणात त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. चॅटर्जी दहा वेळा लोकसभेचे खासदार होते. तर यूपीए-1 च्या सरकारमध्ये ते 2004 पासून 2009 पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष होते.

माकपने हकालपट्टी केली
2008 मध्ये भारत-अमेरिका अणुऊर्जा करार विधेयकाच्या विरोधात माकपने यूपीए-1 सरकारचा पाठिंबा काढला होता. तेव्हा सोमानाथ चॅटर्जी लोकसभा अध्यक्ष गोते. माकपने त्यांना पद सोडण्यास सांगितलं होतं. परंतु त्यांनी नकार दिला. यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली.

ममता बॅनर्जींकडून पराभव
राजकीय कारकीर्दीत एकमागोमाग एक विजय मिळवणारे सोमनाथ चॅटर्जी आयुष्यातील एक निवडणूक पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून हरले. 1984 मधील लोकसभा निवडणुकीत जादवपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी या दिग्गज नेत्याला पराभूत केलं होतं.