नवी मुंबई: 'वन नेशन वन टॅक्स'चा नारा देत मोदी सरकारनं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू केला, ज्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत.सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेच्या किंवा जीवनावश्यक वस्तूंवर सर्वात कमी म्हणजे 5 टक्के तर केवळ चैनीसाठी असणाऱ्या वस्तूंवर 28 टक्के कर आकारण्यात येईल.


वस्तू आणि सेवा करासाठी 4 दर निश्चित करण्यात आले आहेत. ज्यात 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के कर आकारणीची मुभा आहे. वस्तू आणि सेवा कर समितीच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली.

कोणत्या गोष्टीवर किती टॅक्स लावणार याबाबत एक विस्तृत अशी यादी तयार करण्यात येणार असून केंद्र आणि राज्य मिळून तयार करण्यात आलेल्या जीएसटी काउंसिल बैठकीत ती यादी पक्की होईल. अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली आहे.

- अन्नधान्यावर शून्य टक्के टॅक्स

- सर्वसाधारण वापरच्या आणि सर्वाधिक खापच्या गोष्टींवर 5 टक्के जीएसटी

- 12 ते 18 टक्के यामध्ये दोन स्टँडर्ड रेट ठेवण्यात आले आहेत. यामध्ये साबण, शॅम्पू, शेविंग क्रिम यासारख्या गोष्टी आहेत.

- 28 टक्के जीएसटी टीव्ही, फ्रीज सामान्य कार यासारख्या गोष्टींवर असणार आहे.

- पान मसाला, तंबाखूचे उत्पादन आणि चैनीच्या वस्तूंवर 28 टक्के जीएसटी असणार आहे. तसेच यावर सेस देखील लागू करण्यात येणार आहे.

दरम्यान, सेस 5 वर्षासाठी असणार आहे. असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सेसमधून किमान 50 हजार कोटींची कमाई होणार आहे.

अर्थमंत्री जेटलींनी स्पष्ट केलं आहे की, प्रत्येक दर हे सामान्य माणसांना समोर ठेऊन निश्चित करण्यात आले आहेत.