Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवर चर्चा केली. 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण जिंकल्याबद्दल मोदींनी नीरजचे प्रथम अभिनंदन केले.


पंतप्रधान मोदी नीरज चोप्रा यांना फोन करून म्हणाले, की "नीरज तुमचे अभिनंदन. आज ऑलिम्पिक पूर्ण होण्याच्या दिशेने जात आहेत आणि तुम्ही देशाला आनंदी केले आहे. पानिपतने पाणी दाखवलं. पण यावेळी ऑलिम्पिक एक वर्ष उशीर झालं. त्यामुळे तुम्हाला एक वर्ष जास्त मेहनत घ्यावी लागली. त्याचवेळी, आपत्तीच्या काळात अनेक संकटं आली. अनेक प्रकारचे त्रास झाले. अशा परिस्थिती तुम्ही जखमीही झाला होता. पण असे असूनही तुम्ही एवढा मोठा पराक्रम दाखवला. हे फक्त अविरत परिश्रम केल्यानंतरच होऊ शकतं.


ते पुढे म्हणाले, की "ज्या दिवशी तुम्ही खेळण्यासाठी जाणार होता, आणि मी तुमच्याशी बोललो. त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर मी आत्मविश्वास असल्याचं पाहिलं होतं. तुमच्यावर कोणताही दबाव असल्याचे मला दिसले नाही. तुम्ही देशाचे नाव उज्ज्वल केले आहे आणि देशाच्या तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे. तुम्ही सैनिक आहात, त्यामुळे मला माहित आहे की तुम्ही आणखी खेळाडू तयार करु शकता."


पंतप्रधान पुढे म्हणाले, की "तुमच्या आई आणि वडिलांना माझा प्रणाम सांगा. कारण हा देश आणि तुमच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आणि राधा कृष्णजींचे माझ्या वतीने अभिनंदन करा. त्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. आता 15 ऑगस्टला भेटत आहोत. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन."


सामन्याचा थरार कसा होता?
टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी सायंकाळी खेळलेल्या भालाफेक सामन्यात नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर अंतर पार केले आणि लीडरबोर्डमध्ये अव्वल स्थान पटकावले. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 87.58 मीटर भाला फेकला आणि लीडरबोर्डवर स्वत:ला मजबूत केले आणि एका अर्थाने पदक पक्क केलं. तिसऱ्या प्रयत्नात तो केवळ 76.79 मीटर अंतर पार करू शकला. त्याचा चौथा प्रयत्न फॉल ठरला. नीरजचा पाचवा प्रयत्नही फोल ठरला.


नीरजची सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी
ऑलिम्पिकच्या आधीही नीरजला पदकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते आणि 23 वर्षीय खेळाडूने पात्रतेच्या पहिल्याच प्रयत्नात 86.59 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठण्याच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. संपूर्ण देश शनिवारी आशा करत होता की नीरज देशासाठी सुवर्ण आणेल आणि तो अपेक्षांवर खरा उतरला. या सुवर्णपदकासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 7 वर गेली आहे.