2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यूपीएसोबत?
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2018 04:29 PM (IST)
शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते.
नवी दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नवी दिल्लीत भेट झाली. या भेटीनंतर भाजपप्रणित एनडीएची साथ सोडलेल्या राजू शेट्टी आता यूपीएची साथ देणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. येत्या 29 मार्च रोजी देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी राजू शेट्टींनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असणारे राजू शेट्टी 2019 च्या निवडणुकीला यूपीएसोबत जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यासंदर्भातील अधिकृत घोषणा केलेली नाही. या भेटीच्या वेळी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश हेदेखील उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. सत्तेत सहभागी असूनही राजू शेट्टी कमालीचे नाराज होते. त्यामुळेच सत्तेला रामराम ठोकून ते एनडीएमधून बाहेर पडले होते. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत सदाभाऊ खोत यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.