बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली आहे, असा दावा कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांना केला. एसआयटीकडून या प्रकरणाचे पुरावे जमा करण्याचं काम सुरु आहे. त्यानंतर मारेकऱ्यांना अटक केली जाईल, असं कर्नाटक सरकारने म्हटलं आहे.


पोलिसांनी यापूर्वी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मारेकऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित मारेकरी स्पष्ट दिसत होता. या हल्ल्यामागे कोण आहे हे माहित आहे. मात्र ठोस पुरावे जमा केले जात आहेत. पुराव्यांशिवाय त्यांची नावं जाहीर केली जाऊ शकत नाहीत. पुरावे मिळताच मारेकऱ्यांना अटक केली जाईल, अशी माहिती रामलिंगा रेड्डी यांनी दिली.

कोण होत्या गौरी लंकेश ?

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरला राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.

गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.

गौरी यांच्याविरोधात गेल्या वर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता.

2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.

2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाडमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या :

गौरी लंकेश हत्या : हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस

हिंदुत्वाला विरोध केल्यानंच गौरी लंकेश यांची हत्या : राहुल गांधी

गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली? चौकशीसाठी SIT ची स्थापना

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या