Khorasan Province Planning: अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ले करणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविन्स (ISKP) पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या सांगण्यावरून भारतात हल्ला करू शकते. यासाठी त्यांनी आपल्या कर्नाटक आणि काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांशी संपर्कही साधला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध कुरापतींसाठी आता पाकिस्तान अफगाणिस्तानचा वापर करणार हे हळूहळू समोर येऊ लागलंय.


भारतीय गुप्तचर संस्थांनी या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. अलीकडेच पकडलेल्या कथित दहशतवाद्यांनीही चौकशी दरम्यान हे उघड केले आहे की ते पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या म्होरक्यांच्या संपर्कात होते.


 इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविन्सचा कट


अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणणारे ISKP आता ISI च्या सांगण्यावरुन आणखी एका रक्तरंजित षडयंत्राची तयारी करत आहे. या तयारीसाठी त्यांनी भारतात असलेल्या आपल्या दहशतवाद्यांशीही संपर्क साधला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या रिपोर्टनुसार, या संभाषणादरम्यान, आयएसच्या बॉसने त्यांच्या भारतातील दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी स्फोटके आणि शस्त्रे खरेदी करावीत. यासाठी लागणारा संपूर्ण आर्थिक रसद पुरवली जाईल.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या षडयंत्राची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक आणि काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्यांची गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी कबूल केले की ते अनेकदा स्फोटांच्या कटाचा भाग होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना आश्वासन दिले होते की या कामासाठी सर्व शक्य मदत केली जाईल.


उजव्या विचारसरणीचे नेते, मंदिरे, पाश्चिमात्य देश दहशतवाद्यांच्या निशाण्यावर


गुप्तचर अहवालांनुसार, ISKP च्या या दहशतवाद्यांचे लक्ष्य उजव्या विचारांचे नेते, मंदिरे, पाश्चिमात्य देश आणि गर्दीच्या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच ते परदेशी लोकांनाही लक्ष्य करू शकतात. भारतीय गुप्तचर संस्थांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना या कटाबाबत अलर्ट जारी केला आहे. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांच्या संभाषणात जे आळळलं आहे, त्यानुसार ते भारतात अनेक ठिकाणी स्फोट आणि आत्मघाती हल्ले करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. 


गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA ने यापूर्वी जम्मू -काश्मीर आणि कर्नाटकातून इसिसच्या लोकांना अटक केली होती. तेव्हा आयएसच्या व्हॉईस ऑफ हिंद नेटवर्कचाही भंडाफोड करण्यात आला होता. सध्या, भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा संस्था या षडयंत्राच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत की हे लोक कोण आहेत जे ISKP च्या या कटात सामील आहेत.