चंदीगड (पंजाब) : पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील नाभा कारागृहातून पलायन केलेला कैदी हरमिंदर सिंह मिंटूला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचे पाच साथीदार अद्यापही फरार आहेत. हरमिंदर सिंह मिंटू हा खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. नाभा हे पंजाबमधील सर्वात सुरक्षित जेल मानलं जातं. रविवारी सकाळी आठच्या सुमारास पोलिसांच्या वेशात आलेल्या 10 बंदुकधाऱ्यांनी नाभा कारागृहावर हल्ला करुन, कैदी हरमिंदर सिंह मिंटूसह त्याच्या पाच साथीदारांची सुटका केली.
पलायन केलल्यांमध्ये गँगस्टर विकी गोंडर, गुरप्रीत शेखो, नीता देओल आणि विक्रमजीत सिंह यांचा समावेश आहे.
दहशतवाद्यांना पळण्यास मदत करणारा अटकेत याव्यतिरिक्त कैद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या परमिंदर सिंह यालाही अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शामलीमधून परमिंदर सिंहच्या मुसक्या आवळल्या. परमिर सिंहवर कैद्यांना पळून जाण्यासाठी गाड्या पुरवल्याचा आरोप आहे.
कोण आहे हरमिंदर सिंह मिंटू? हरमिंदर सिंह मिंटू खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख आहे. दोन वर्षांआधी पंजाब पोलिसांनी मिंटूला मलेशियामधून अटक केली. पाकिस्तानच्या माध्यमातून भारतात मोठी दहशतवादी कारवाई करण्याचा मिंटूचा हेतू होता. त्याचवेळी मलेशिया पोलिसांच्या मदतीने पंजाब पोलिसांनी मिंटूला गजाआड केले.
47 वर्षीय हरमिंदरसिंह मिंटूवर डेरा सच्चा सौदाच्या राम रहीम यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. 2010 मध्ये हलवाडा हवाई तळावर स्फोटकं पेरल्याचा त्याचावर आरोप आहे. खलिस्तान चळवळीसाठी निधी गोळा करण्याचं काम तो करतो. खलिस्तानी संघटनेत तरुणांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेटचा पुरेपूर वापर तो करतो. एकूण 10 दहशतवादी कारवायांप्रकरणी त्याला 2014मध्ये अटक करण्यात आली होती.
विकी गोंडर कोण आहे? नाभा जेलमधून पळालेल्या सहा जणांमध्ये गँगस्टर विकी गोंडरचाही समावेश आहे. विकी गोंडर हा मुक्तसरचा रहिवाशी आहे. सुख्खा कांलवा या गँगस्टरची विकीने हत्या केली होती.