भारत बंदी की भ्रष्टाचार बंद? : पंतप्रधान मोदी
सोशल मीडियावर भारत बंद विषयी अनेक विनोद व्हायरल होत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे विरोधकांचा समाचार घेतला आहे.
सरकार काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचे मार्ग बंद करत आहे, पण दुसरीकडे काही जण भारत बंद करत आहेत, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे.
https://twitter.com/narendramodi/status/802855961161408513
काँग्रेसचं जन आक्रोश आंदोलन
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस भारत बंदमध्ये सहभागी होणार नाही. मात्र काँग्रेसकडून केवळ जन आक्रोश दिन साजरा केला जाणार आहे.
सपा, बसपा भारत बंदमध्ये सहभागी नाही
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि पंजाबमध्ये भाजपची सत्ता आहे. तर या ठिकाणी मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आहे. त्यामुळे या ठिकाणी बंदचा प्रश्न येणार नाही. दुसरीकडे देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पार्टीने भारत बंदचा कसलाही निर्णय घेतलेला नाही. तर मायावती देखील भारत बंदसोबत नसल्याची माहिती आहे.
ममता बॅनर्जी, केजरीवालही भारत बंदमध्ये सहभागी नाही
दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने भारत बंदची कसलीही घोषणा केलेली नाही. मात्र केवळ जिल्हा अधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केलं जाणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीला तीव्र विरोध केला आहे. मात्र त्यांनीही भारत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र कोलकात्यात केवळ मोर्चा काढला जाणार आहे.
दरम्यान डाव्या पक्षांनी पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरामध्ये भारत बंदची हाक दिली आहे. मात्र याचा कसलाही परिणाम होणार नसल्याची सुत्रांची माहिती आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमुल काँग्रेसच भारत बंदमध्ये सहभागी नाही.
नितीश कुमारांचा नोटाबंदीला पाठिंबा
बिहारमध्ये भारत बंदचा कसलाही परिणाम होणार नसल्याचं चित्र आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष जेडीयूने नोटाबंदीला अगोदरच पाठिंबा दिला आहे. मात्र लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीच्या भूमिकेविषयी अजूनही सस्पेंस कायम आहे.
झारखंड-ओडीशाही भारत बंदमध्ये सहभागी नाही
झारखंडमध्ये भाजप सत्ताधारी पक्ष आहे. तर काँग्रेस, जेव्हीएम, जेएमएम, जेडीयू या विरोधी पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन भारत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
ओडीशामध्येही भारत बंदचा काही परिणाम होणार नाही. कारण ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अगोदरच नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
डीएमके केवळ निदर्शने करणार
हरियाणामध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र येथील इंडियन नॅशनल लोकदल पक्षाने भारत बंदचं समर्थन केलं आहे. त्यामुळे भारत बंदचा काही प्रमाणात परिणाम हरियाणामध्ये दिसण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्य देखील भारत बंदमध्ये सहभागी नसतील. तामिळनाडूमध्ये करुणानिधी यांचा पक्ष डीएमकेने केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांबाहेर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जयललिता यांचा एआयडएडीएमके पक्ष या विरोधामध्ये देखील सहभागी नसेल.