वायनाड: महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी केरळमधील काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाडमधील कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावर आता कालपेट्टा पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये राहुल गांधी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 


 






पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्या लोकांचा या घटनेशी संबंध असल्याची खात्री पोलीस करत आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी दोघे हे राहुल गांधी यांच्या वायनाडमधील कार्यालयातील कर्मचारी असून इतर दोघे हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. 


महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर हे कृत्य स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकत्यांनी केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांच्या कार्यालयाच्या वतीनं करण्यात आला होता. 


राहुल गांधी यांच्या कार्यालयातील भिंतीवर महात्मा गांधी यांचा एक फोटो लावण्यात आला होता. 24 जून रोजी या कार्यालयामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकत्यांनी या कार्यालयात प्रवेश केला आणि कार्यालयाची तोडफोड केली. 


स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे वायनाड जिल्हाध्यक्ष जिश्नू शशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यलयामध्ये प्रवेश केला. त्यावेळी केरळच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांच्या कार्यालयातील कर्मचारी केआर अवस्थी यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यामुळे या तोडफोडीमागे राज्यातील सीपीआय एम सरकारचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तर आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, केआर अवस्थी यांना त्यांच्या कार्यालयातून या आधीच कमी करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही.