मुंबई : गेल्या 100 वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील सर्वच स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. आता परदेशातूनही मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यूनायटेड अबर अमिरातकडून (UAE) 700 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी याबाबत माहिती दिली.


केरळातील अनेक लोक कामाधंद्याच्या निमित्ताने यूएईमध्ये वास्तव्यास असतात. अमिरातीच्या विकासात केरळी लोकांचं योगदान लक्षात घेता यूएई सरकारने ही मदत केली आहे.

केरळमध्ये पावसाने अक्षरश: हाह:कार माजवला होता. पुराने वेढा घातला होता. कालपासून पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता केरळला मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरुन मदत केली जात आहेच, सोबत वैयक्तिक पातळीवरही अनेकजण केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपापल्या परीने योगदान देत आहेत.

केरळमधील पुरात आतापर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, 10 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. शिवाय, कित्येकजण अद्याप बेपत्ता आहेत.

केंद्र सरकारसह इतर राज्यांचीही मदत

केंद्र सरकारने केरळला 500 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली, तसेच विविध राज्यांनीही मदतनिधी दिला आहे. महाराष्ट्राने 20 कोटी रुपये दिले, तसेच 110 डॉक्टरांच्या टीमसोबत स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन केरळच्या मदतीसाठी गेले आहेत.

दिल्ली सरकारने 10 कोटी, तेलंगणा 25 कोटी, आंध्र प्रदेश 10 कोटी आणि पंजाब सरकारने केरळला 10 कोटींचं अर्थसहाय्य जाहीर केलं असून, तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे.

केरळमध्ये 'तीव्र नैसर्गिक संकट' जाहीर

केरळातील पूरपरिस्थितीला केंद्र सरकारनं तीव्र नैसर्गिक संकट जाहीर केलं आहे. पुराची तीव्रता आणि कोसळलेल्या दरडी यामुळं गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला. केरळमध्ये महापुराने थैमान घातलं. सध्या पावसाचा जोर ओसरला आहे.

सिनेसृष्टीकडूनही मदतीचा हात

सिनेसृष्टीनेही केरळला मदतीचा हात दिला आहे. हिंदी असो किंवा दक्षिणेकडील सिनेसृष्टी असो, कलाकार मंडळी मदतीसाठी पुढे आले आहेत.

  • बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने आपली एनजीओ ‘मीर फाऊंडेशन’द्वारे केरळला 21 लाख रुपयांची मदत केली आहे.

  • अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काम करणारी एनजीओ ‘हॅबिटेट फॉर ह्यूमॅनिटी इंडिया’ला 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केरळच्या महापुराने झालेली परिस्थिती खूपच दु:खद आहे, असं जॅकलिनने म्हटलं आहे.

  • दक्षिणेचे सुपरस्टार आणि राजकीय नेते कमल हसन यांनी 25 लाखांची मदत दिली. तर अभिनेता सूर्यानेही 25 लाख रुपयांचं योगदान दिलं.

  • तमिळ अभिनेता धनुषने केरळला मदतीचा हात दिला आहे. त्याने 15 लाख रुपये सहाय्यता निधीला दिले. तर अभिनेता विशाल आणि शिवकार्तिकेयन यांनीही 10-10 लाख रुपये दिले.

  • तेलुगू स्टार विजयने 5 लाखांची मदत दिली आहे. शिवाय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने 1 लाख रुपये दिले.

  • ‘बाहुबली’ फेम सुपरस्टार प्रभासने केरळ रिलीफ फंडमध्ये 25 लाख रुपये दिले.

  • अल्लू अर्जुनने केरळ रिलीफ फंडसाठी 25 लाख रुपये दिले. शिवाय लोकांनीही मदतीचा हात द्यावा, असं आवाहन केलं.

  • मीडिया रिपोर्ट्सनुसार दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनीही केरळला 15 लाखांची मदत केली आहे.


दरम्यान, केरळमधील परिस्थितीवर चर्चेसाठी 30 ऑगस्ट रोजी विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केरळ सरकारने राज्यपाल पी. साथसिवम यांना केली आहे. तत्पूर्वी, आज दुपारी 4 वाजता केरळ सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत केरळमधील परिस्थितीवर चर्चा केली जाईल.