लखनौ : समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस आणि माजी राज्यसभा खासदार अमर सिंह नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या सोबतीने अमर सिंह नवी राजकीय इनिंग सुरु करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त 'पत्रिका' वेबसाईटने दिलं आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी अमर सिंह यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या नवीन पक्षाला भाजपचा पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे.
अमर सिंह यांनी पक्षाचं नाव निश्चित केलं असून 15 ऑगस्टनंतर याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. नवीन पक्षासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागाकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अमर सिंह आपले उमेदवार मैदानात उतरवतील. सप आणि बसप या दोन पक्षांना चारीमुंड्या चित करण्यासाठी भाजप या ठिकाणी अमर सिंह यांच्या पक्षाला समर्थन देण्याची चिन्हं आहेत.
अमर सिंह यांनी जानेवारी 2010 मध्ये समाजवादी पक्षातील सर्व पदांवरुन राजीनामा दिला होता. महिन्याभरातच सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. 2011 मध्ये काही काळ त्यांनी न्यायालयीन कोठडीतही घालवला.
2011 मध्ये राष्ट्रीय लोक मंच हा स्वतःचा पक्ष त्यांनी सुरु केला. 2012 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी 360 जागांवर उमेदवार दिले, मात्र एकही जण निवडून आला नाही. मार्च 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोक दल या पक्षात प्रवेश केला. फत्तेहपूर सिक्री या लोकसभेच्या मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.
'समाजवादी पक्षा'च्या नेत्यासह अमर सिंह नवीन पक्ष काढणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2018 01:59 PM (IST)
पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी अमर सिंह यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं म्हटलं जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -