तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये सुरु असलेल्या महापुराने गुरुवारी आणखी 30 बळी घेतले. मृतांची एकूण संख्या आता 173 वर पोहोचली आहे. या पावसामुळे घरे वाहून गेली असून रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे, तर विमान सेवा आणि रेल्वे वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाला आहे. आत्तापर्यंत तब्बल आठ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती केरळ सरकारने दिली आहे.

राज्यातल्या 14 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोचीनपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरांमध्येही दोन मजली इमारतींएवढं पाणी असून अक्षरश: लाखो लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार संरक्षण मंत्रालयाने तातडीने मदतकार्यासाठी आणखी पथके रवाना केली आहेत. मदत छावण्यांमध्ये आतापर्यंत दीड लाख विस्थापित आणि बेघरांनी आश्रय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी केरळला भेट देणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे.

राज्यात सगळ्यात जास्त फटका अर्नाकुलमजवळच्या पेरियार नदीलगतच्या गावांना बसला आहे. इडुकी या भागाचा तर संपर्क संपूर्णपणे अन्य भूभागापासून तुटला आहे. आठ ऑगस्टपासून गेले आठ दिवस पावसाने आणि पुराने केरळच्या बहुतांश भागाला झोडपलं आहे. कासारगोड वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे.

लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या 52 तुकड्या मदतकार्यात जुंपल्या आहेत. अनेक अशासकीय संस्थाही मदतीसाठी सरसावल्या आहेत. पूरस्थितीमुळे कोचीन विमानतळावरुन विमान सेवा 26 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.