Kerala Anti Port Protest: केरळमधील (Keral) अदानी बंदराच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी लॅटिन कॅथलिक चर्चच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी रविवारी विझिंजम पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 29 पोलीस जखमी झाले आहेत. तसेच, आंदोलकांनी पोलिसांच्या अनेक वाहनांचंही नुकसान केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावानं पोलीस ठाण्यावर लाठ्या आणि दगडफेक केली. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ला केला.


दरम्यान, 26 नोव्हेंबरला झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती आणि अनेकांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "किमान 29 पोलीस या घटनेत जखमी झाले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे." या घटनेची दखल घेत केरळ सरकारनं इतर जिल्ह्यांमध्ये मोठा फौजफाटा तैनात केला आहे.  


माध्यमांच्या प्रतिनिधींवरही हल्ला 


आंदोलकांनी केरळमधील स्थानिक चॅनल 'ACV' शेरीफ एम जॉन यांच्या कॅमेरामनवरही हल्ला केला आणि त्यांच्या कॅमेराचं नुकसान केलं. त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. सध्या कॅमेरामन शेरीफ एम जॉन यांना तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानं चर्चच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. यासंदर्भात बोलताना लॅटिन कॅथलिक चर्चचे प्रतिनिधी फादर ई. परेरा म्हणाले की, "चर्च शांतता राखू इच्छित आहे."


फादर ई. परेरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आम्ही आंदोलकांशी बोलू. हे प्रकरण शांततेनं सोडवण्यासाठी मी आलोय." आदल्या दिवशी, राज्य पोलिसांनी शनिवारी विझिंजाममधील हिंसाचाराच्या संदर्भात शहरातील मुख्य बिशप थॉमस जे नेटो आणि परेरा यांच्यासह किमान 15 लॅटिन कॅथोलिक धर्मगुरूंविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 


एडीजी म्हणाले की, "गेल्या 120 दिवसांहून अधिक काळ निदर्शनं सुरू आहेत. आम्ही जास्तीत जास्त संयम दाखवला. पण रविवारी जमावानं पोलीस स्टेशनची तोडफोड केली आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला." परिसरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता केरळ सरकारनं मोठा फौजफाटा तैनात केला आहे.