नवी दिल्ली : आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान करावं, अशी मागणी करणारं पत्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे.


दिल्ली महापालिका निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान न करता बॅलेट पेपरने करावी, असं अरविंद केजरीवाल यांनी पत्रात सांगितलं आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते.

"जर उत्तर प्रदेशात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका बॅलेट पेपरने होऊ शकतात, तर दिल्लीतही महापालिका निवडणूक बॅलेट पेपरद्वारे होऊ शकतात. ईव्हीएममधील घोळाच्या संशयाने दिल्ली सरकार महापालिका निवडणुकीत ईव्हीएमची रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्यासाठी अरविंद केजरीवाल आग्रही आहेत," असं आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सांगितलं.

यापूर्वी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर बसपाच्या प्रमुख मायावती आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांनीही ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे दिल्ली महापालिका निवडणूक घेण्याचं आवाहन अरविंद केजरीवाल यांना केलं होतं.

"ईव्हीएमद्वारे होणाऱ्या निवडणुकीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांनी निष्पक्ष आणि निर्विवाद निवडणुकीसाठी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक करण्याचं आवाहन करतो," असं ट्वीट अजय माकन यांनी केलं होतं.