बंगळुरु : ईशान्य भारतातील तरुणाला बंगळुरुत बेदम मारहाणीची घटना घडली आहे. पाणी वाया घालवल्याच्या क्षुल्लक कारणावरुन क्राईस्ट विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या हिगीयो ग्युन्टे याला घरमालकाने बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीने चपला चाटायला सांगितलं.

अरुणाचल प्रदेशमधील रहिवाशी असलेला हिगीयो ग्युन्टे बंगळुरुतील क्राईस्ट विद्यापीठात शिकत आहे. हिगीयो बंगळुरुतील हुलीमावूमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहतो.

हिगीयोच्या आरोपानुसार, पाणी वाया घालवल्याने घरमालकाने बेदम मारहाण केली. त्यावेळी हिगीयो जमिनीवर पडला. त्यानंतर घरमालकाने पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत हिगीयोची जीभ कापली गेली आणि तोंडातून रक्त वाहू लागलं.

यादरम्यान घरमालक शिव्या देत होता, शिवाय घरमालकाने जबरदस्तीने चपला चाटण्यासही सांगितल्याचा आरोप हिगीयोने केला आहे.



या घटनेनंतर हिगीयोच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, हेमनाथ कुमार घरमालक असून, चौकशी सुरु करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, रिजीजू यांनी ट्वीट केलंय की, “गृहमंत्रालय या घटनेकडे गांभिर्याने पाहत आहे. एकीकडे आपण परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेवर बोलतो आहोत आणि दुसरीकडे आपल्याच देशात अशा घटन घडत आहेत.”

https://twitter.com/KirenRijiju/status/841260908890456064

6 मार्च रोजी झालेल्या या घटनेविरोधात गुरुवारी तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी घरमालकाने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.