नवी दिल्ली : पोलीस आणि अधिकाऱ्यांची बदली करणं किवा नियुक्ती करणं यापासून दूर राहा, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या खासदारांना दिला. उत्तर प्रदेशच्या खासदारांसोबत मोदींनी आज ‘ब्रेकफास्ट मीटिंग’चं आयोजन केलं होतं.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत केलेली मेहनत यापुढेही कायम ठेवा, असंही मोदींनी खासदारांना सांगितलं. शिवाय घवघवीत यशासाठी घेतेल्या मेहनतीबद्दल सर्वांचं अभिनंदनही केलं, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
पोलीस किंवा अधिकारी उत्तमरित्या काम करत नसतील, तर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. पण सुशासन हाच आपला मंत्र आहे. याचा फायदा विरोधकांना झाला तरीही चालेल, पण बदली किंवा नियुक्ती करण्यापासून सर्वांनी दूर रहावं, असं मोदी म्हणाले.
मोदींच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांनी उत्तर प्रदेशात भाजपला त्यांच्या मतदारसंघात शंभर टक्के यश मिळवून दिलं. कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह, मेनका गांधी, उमा भारती, राज्यमंत्री नरेंद्र नाथ पांडेय, साध्वी निरंजन ज्योती, संजीव बालयान, संतोष गंगवार आणि अनुप्रिया पटेल यांनी त्यांच्या मतदार संघात पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं.
भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 403 पैकी 325 जागांवर विजय मिळवला. यामध्ये मित्रपक्षांच्या 13 जागांचा समावेश आहे. समाजवादी-काँग्रेसला 54, तर बसपाला 19 जागांवर विजय मिळाला.