मुंबई : चांदोबा, विक्रम-वेताळ यांसारख्या लहान मुलांमध्ये प्रसिध्द असणाऱ्या पुस्तकातील चित्रकार के.सी. शिवशंकर (97) यांचे चेन्नई येथे त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. शिवशंकर हे चंदामामाच्या मूळच्या टीममधील शेवटचे कलाकार होते. ते आर्टिस्ट शंकर या टोपन नावाने प्रसिध्द होते. त्यांना अनेक स्तरातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी गिरीजा, चार मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांनी चांदोबासाठी 1960 साली रेखाटलेलं विक्रम-वेताळ मालिकेतील आपल्या एका खांद्यावर वेताळचा मृतदेह आणि दुसऱ्या हातात तलवार घेतलेल्या विक्रमचे चित्र प्रचंड प्रसिध्द झाले. ते चित्र आणि त्याच्या खाली त्यांची सही हे चांदोबा वाचणाऱ्याच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या चित्रशैलीवर भारतीय, मध्य पूर्व आणि युरोपियन कलाशैलीचा प्रभाव होता.
के. सी. शिवशंकर यांचा जन्म 1924 साली तामिळनाडूतील इरोड या खेडेगावात झाला. त्यांचे वडील स्थानिक शाळेत शिक्षक होते तर आई गृहिणी होती. 1934 साली त्यांनी चेन्नईला स्थलांतर केले. 1941 साली त्यांनी चेन्नईतील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फाइन आर्टस् या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे शिवशंकर यांची चित्रशैली पाहून त्यांचे शिक्षक प्रभावित झाले. पदवी प्राप्त केल्यानंतर 'कलाईमगल' या नियतकालिकेत त्यांनी नोकरी सुरू केली. 1952 साली त्यांना 'चंदामामा' या नियतकालिकेत नोकरी मिळाली आणि एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे जन्माला आली. विक्रम-वेताळचे चित्र त्यापैकीच एक. चंदामामाचे संस्थापक बी. नागी रेड्डी यांच्या मते शिवशंकर हे चंदामामा टीमचे महत्वपूर्ण घटक होते. त्यांच्या उपनिषिधे, पुराण आणि इतिहासातील अनेक अप्रतिम चित्रांमुळे आत्ताच्या पिढीतील अनेकांचे बालपण स्मरणात राहिले आहे.
'चंदामामा' या लहान मुलांसाठीचे मूळचे तेलगु भाषिक नियतकालिकाची स्थापना 1947 साली चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी आणि चक्रपाणी यांनी स्थापना केली. तेरा भारतीय भाषांत प्रकाशित होणाऱ्या या नियतकालिकेने लहान मुलांच्या विश्वात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. तामिळ भाषेत 'अंबुलीमामा' या नावाने प्रकाशित होणाऱ्या या नियतकालिकेची हिंदी भाषेतील आवृत्ती 1949 साली सुरू झाली. 1952 साली मराठी भाषेत 'चांदोबा' या नावाने ही नियतकालिका सुरू झाली आणि अल्पावधीतच लहान मुलांच्यात प्रसिध्द झाली.
सध्या मुलांच्या मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या आहेत. मोबाईल गेम्स, टिव्हीवरील कार्टून्स् चॅनेल्स, इंटरनेट अशा अनेक गोष्टीत लहान मुले गुरफटली आहेत. पण पूर्वीच्या काळी या सगळ्या सुविधा नसताना मुलांना मैदानी खेळांसोबत वाचन हेच मनोरंजनाचे साधन होते. त्याकाळी प्रामुख्याने गोष्टींच्या कथा वाचल्या जायच्या. मुलांना वाचायला काय आवडते असा प्रश्न विचारल्यास चांदोबा हे नाव हमखास त्यांच्या तोंडी यायचे.
नीतीमत्ता आणि नैतिकता, भारतीय संस्कृती आणि संस्कार या गोष्टी चांदोबाच्या कथांच्या मूळाशी असायच्या. महाभारत, रामायण, विष्णूपूराण, लोककथा, दंतकथा याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती लहान मुलांसमोर मांडली जायची. या गोष्टींची मांडणी आजीबाईच्या गोष्टींच्या स्वरूपात असल्याने लहान मुलांना ती अधिक भावते. ऐकणाऱ्याला आपण स्वत: त्या गोष्टीचा नायक असल्याचं भासत असे. त्यामुळे चांदोबाने अनेक पिढ्यांची सांस्कृतीक संवेदनशिलता आणि वाचनाची सवय विकसित केली.
विक्रम वेताळच्या कधीही न संपणाऱ्या कथा, प्रत्येक वेळी राजा विक्रमला नैतिक प्रश्न विचारून त्याला कोड्यात टाकून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयन्त करणारा वेताळ, कलावती, वीरबाहू, जयमाला यांच्यासह अनेक कथांनी चांदोबाने अनेकांचे बालपण चंदेरी केले. प्रत्येक कथेमागे काहीतरी बोध असायचा. आजही अनेकांनी त्याच्या लहानपणी वाचलेले चांदोबाचे अंक जतन करून ठेवले आहेत. त्यामुळे कितीही वय झाले तरी त्यांना त्यांच्या बालपणात रमता येतं, त्यांचं बालपण टिकवून ठेवता येतं.
2007 साली जिओडेसिक या मुंबईतील सॉफ्टवेअर कंपनीने या नियतकालिकेतील सगळी माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी मालकी मिळवली. 2013 साली आर्थिक अडचणींमुळे या नियतकालिकेचे प्रकाशन बंद झाले. आजच्या टिव्ही, इंटरनेट, मोबाईलच्या काळात चांदोबाची लोकप्रियता कमी झाली असली तरी आजही चांदोबाचा वारसा सांभाळणारे लोक काही कमी नाहीत. 2017 साली काही स्वंयसेवकांच्या पुढाकाराने चांदोबाच्या कथांचे डिजिटलायझेशन करुन याचे जतन करण्यात येत आहे.