Ambreen Bhat Murder : जम्मू-काश्मीरमधील टीव्ही कलाकार अमरीन भटच्या (Ambreen Bhat) हत्येनंतर आता सुरक्षा दलांनी ही घटना घडवून आणणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दोन्ही दहशतवादी काश्मीरमधील अवंतीपुरा (Awantipora) येथे ठार झाल्याचं सांगण्यात आलं. अभिनेत्रीची हत्या झाल्यापासून सुरक्षा दल सतत दहशतवाद्यांचा शोध घेत होतं आणि त्यासाठी शोध मोहीम राबवली जात होती. हत्येनंतर सुमारे दोन दिवसांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.


सुरक्षा दलांनी कशी राबवली मोहीम 


दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. सर्व ठिकाणांहून दहशतवाद्यांची गुप्त माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर हे दोन्ही दहशतवादी अवंतीपुरा भागात लपून बसल्याचं निष्पन्न झालं. सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले. 


कुटुंबाला मोठा धक्का


35 वर्षीय टीव्ही कलाकार अमरीन यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पुतण्यालाही गोळी लागली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  अमरीन यांची हत्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का होता. अमरीन यांच्या कमाईतून घर चालायचं. दहशतवाद्यांनी आमच्याकडून सर्व काही काढून घेतलं, असा शोक त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. कुटुंबीय सध्या न्यायाची मागणी करत होते. 


बडगाममध्ये 15 दिवसांत सलग दुसरी हत्या झाल्यानंतर लोकांचा संताप वाढत होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी विशेष मोहीम राबवून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आणि अमरीनला ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी 80 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या हत्येची जबाबदारी काश्मीरच्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं घेतली होती.


दरम्यान, अमरीन यांच्या व्हिडीओंना खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. अमरीनच्या हत्येनंतर त्यांचे चाहते संतप्त आणि दु:खी आहेत. तसेच, अमरिन यांच्या जाण्यानं कुटुंबीयांना मोठा धक्का मिळाला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Amreen Bhat : जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या; उमर अब्दुल्ला यांच्याकडून शोक व्यक्त