नवी दिल्लीः काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. काश्मीरच्या हिंसाचाराबाबत या भेटीत चर्चा झाली. काश्मीरमधील रक्तपात केवळ मोदीच थांबवू शकतात, असा विश्वास बैठकीनंतर मुफ्तींनी व्यक्त केला.

 

मोदींशी बैठक संपल्यानंतर मुफ्ती यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोदींनाही काश्मीरप्रश्नी आमच्या एवढंच दुःख असल्याचं मुफ्ती यांनी सांगितलं. दहशतवादी बुऱ्हान वाणीच्या खात्म्यानंतर फुटीरतवादी लोकांनी काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु केला आहे. गेल्या 50 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात संचारबंदी कायम आहे.

 

..तर परिस्थिती कधीच बदलणार नाही- मुफ्ती

 

दरम्यान मोंदींनी काश्मीरप्रश्नी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह लवकरच याबाबत पाऊल उचलतील, असंही मुफ्ती यांनी सांगितलं. काश्मिर खोऱ्यातील या हिंसाचारामुळं आत्तापर्यंत तब्बल 6 हजार 400 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

 

मोदींकडे सध्या बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात काश्मीरप्रश्न सुटला तर सुटेल अन्यता काश्मीरमधील परिस्थिती कधीच बदलणार नाही. पाकिस्तानशी चर्चेचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तानने स्वतःहून चर्चेची संधी घालवली. त्यामुळे पुढील दिशा मोदीच ठरवतील, असं मुफ्ती म्हणाल्या.

 

संबंधित बातम्याः

काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हीच देशवासीयांची इच्छा: राजनाथ