कर्नाटक: कर्नाटकातील (Karnataka) शिवमोग्गा जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षिकेवर मुस्लिम विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेतील शिक्षिकेने दोन मुस्लिम विद्यार्थ्यांना भारत हिंदू राष्ट्र असल्याने तुम्ही पाकिस्तानात जा, असं सांगितलं आहे. या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर महिला शिक्षिकेची बदली करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


जनता दल सेक्युलरच्या अल्पसंख्याक शाखेचे शिवमोग्गा जिल्हाध्यक्ष नजरुल्ला यांनी याप्रकरणी शिक्षण विभागात तक्रार दाखल केली आहे. हिंदुस्तान टाईम्सने नजरुल्ला यांच्याशी संवाद साधत त्यांनी दिलेली माहिती सांगताना म्हटलं, शिक्षिका मंजुला देवी गुरुवारी (31 ऑगस्ट) पाचवीच्या वर्गातील मुलांना शिकवत होत्या, त्यादरम्यान दोन मुलं आपापसात भांडू लागली. शिक्षिकेने मुलांना खडसावलं आणि म्हटलं, "हा त्यांचा देश नाही, तो हिंदूंचा आहे."


अल्पसंख्याक शाखेचे शिवमोग्गा जिल्हाध्यक्ष नजरुल्ला म्हणाले, "मुलांनी मला या घटनेबद्दल सांगितल्यावर मला धक्का बसला. आम्ही सार्वजनिक सूचना उपसंचालक (DDPI) यांच्याकडे तक्रार केली आणि विभागाने शिक्षिकेवर कारवाई केली आहे."


नेमकं काय म्हणाली शिक्षिका?


या घटनेची चौकशी करणारे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (BEO) बी नागराज यांनी सांगितल्याप्रमाणे, इतर विद्यार्थ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. नागराज म्हणाले, "शिक्षकाने विद्यार्थ्यांना कथितपणे सांगितलं की, हा तुमचा देश नाही, हा हिंदूंचा देश आहे आणि त्यामुळे तुम्ही पाकिस्तानात जा. तुम्ही आमचे कायमचे गुलाम आहात."


या प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी नागराज पुढे म्हणाले, त्यांनी या प्रकरणाचा तपास अहवाल सादर केला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार, प्रकरणावर पुढील निर्णय घेतला जाईल.


यूपीतही घडली मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना


कर्नाटकमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांसोबतची ही घटना नेमकी अशा वेळी घडली, जेव्हा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये घडलेला प्रकार चर्चेत आहे. यूपीतील मुझफ्फरनगरमध्ये एका मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक महिला शिक्षिका वर्गातील विद्यार्थ्यांना मुस्लिम विद्यार्थ्यांना मारण्यास सांगत होती. याशिवाय महिला शिक्षिकाही विद्यार्थ्याबद्दल भाष्य करताना दिसली.


मारहाणीचं प्रकरण चांगलंच पेटलं होतं आणि विरोधी पक्षांनी यासाठी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी, असदुद्दीन ओवैसी यांसारख्या नेत्यांनी हा भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Arrest UP Teacher : यूपीमधील शिक्षिकेच्या गैरवर्तनामुळे बॉलिवूडकर संतापले, रेणुका शहाणे, प्रकाश राज आणि स्वरा भास्करची संतप्त प्रतिक्रिया