नवी दिल्ली :  विधानसभा अध्यक्षांकडे आधी आपली बाजू मांडा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील बंडखोर आमदांरांना दिले आहेत. सोबतच या सर्व आमदारांना सुरक्षा पुरवण्याचेही आदेश देखील सरकारला दिले आहेत. या आदेशानंतर आज सायंकाळी सहा वाजता हे आमदार विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत. तत्पूर्वी आज दुपारी दोनच्या सुमारास हे सर्व आमदार पोलीस सुरक्षेत मुंबईहून बंगळुरुला रवाना होणार आहेत.

सुप्रीम कोर्टात बंडखोर आमदारांच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी कोर्टात बाजू मांडली. यावेळी त्यांनी स्थिती निराशाजनक असून 15 आमदारांचे राजीनामे आले असताना विधानसभा अध्यक्ष निर्णय लांबणीवर टाकत आहेत. आपले कर्तव्य अध्यक्ष बजावत नाहीत, असे रोहतगी यांनी सांगितले. उलट त्या आमदारांचे राजीनामे अयोग्य घोषित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांवर नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोप रोहतगी यांनी केला. यावर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीशांनी आमदारांना पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्यास सांगितले. अध्यक्षांनी जर आमदारांचे ऐकून घेतले नाही तर उद्या सुप्रीम कोर्ट निर्णय देईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे जात आपल्या राजीमान्याची माहिती द्यावी. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांची बाजू ऐकून घ्यावी आणि निर्णय घ्यावा, असे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले.

यानंतर मुकुल रोहतगी यांनी आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. यावर कोर्टाने आमदार एअरपोर्टवरून विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचेपर्यंत कडक सुरक्षा पुरविण्याचे निर्देश कर्नाटकच्या डीजीपींना दिले. कोर्टाच्या या निर्णयानंतर मुंबईतील हॉटेलमध्ये थांबलेले सर्व आमदार आज सायंकाळी सहा वाजता विधानसभा अध्यक्षांना भेटण्यासाठी बंगळुरूला पोहोचतील.

आतापर्यंत 16 आमदारांनी राजीनामे दिल्याने कुमारस्वामी सरकार कोसळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.  बंडखोर आमदार आपले राजीनामे मागे घेण्यास तयार नाहीत तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने राजीनामे दिल्याचे सांगत आठ आमदारांचे राजीनामे नामंजूर केले होते.

आमदार आज दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहून बंगळुरुला रवाना होणार

न्यायालयाच्या आदेशानंतर आज सायंकाळी सहा वाजता हे सर्व बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत. तत्पूर्वी आज दुपारी दोनच्या सुमारास हे सर्व आमदार पोलीस सुरक्षेत मुंबईहून बंगळुरुला रवाना होणार आहेत.  साधारणत: 4 वाजता बंगळुरुला पोहोचल्यावर पोलीस सुरक्षेत सर्व आमदार विधानसभा अध्यक्षांना भेटायला जाणार आहेत. उद्या कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.



आमदारांची मनधरणी करायला गेलेले डीके शिवकुमार रिकाम्या हाती परतले

मुंबईच्या रेनेसॉंस हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी आलेले काँग्रेस नेते डी के शिवकुमार देखील रिकाम्या हाताने बंगळुरूला पोहोचले. काल शिवकुमार हॉटेलवर पोहोचल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते.

आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यास बहुमत भाजपकडे झुकणार?

या आमदारांचा राजीनामा मंजूर झाला तर कर्नाटक राज्यातील बहुमत हे भाजपकडे झुकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या बंडखोरांना शमविण्यासाठी जेडीएसने नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकच्या जेडीएस सरकारमधील सर्वच्या सर्व मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील 21 च्या 21 मंत्र्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण 80 आमदार तर जेडीएसकडे 37 आमदार आहेत. दोन्ही मिळून 117 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते. तसेच बहुजन समाज पार्टी आणि एका अपक्ष आमदारानेदेखील या सरकारला पाठिंबा दिला होता.

संबंधित बातम्या


कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते डीके शिवकुमार मुंबईत तर शिवकुमारांना हॉटेलबाहेरच थांबवा, बंडखोरांची मागणी

कर्नाटकातील सत्तासंघर्ष : कुमारस्वामी यांचं सरकार लवकरच कोसळण्याची शक्यता, राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या 15 वर

कर्नाटक सत्तासंघर्ष | काँग्रेस-जेडीएस सरकारमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे तर भाजपकडून मात्र मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता, राजीनामा दिलेले आमदार मुंबईतल्या हॉटेलमध्ये दाखल

कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकारला धक्का, 11 आमदारांचा राजीनामा