Chhatrapati Shivaji Maharaj Statue At Rajhansgad Fort : कर्नाटकात विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) लवकरच होऊ घातलेली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप, काँग्रेस पक्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करुन जनतेसमोर जात आहेत. राजहंसगड किल्ल्यावर (Rajhansgad Fort) रविवारी (5 मार्च) 52 फूट उंचीच्या भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मूर्तीचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम बेळगावच्या (Belgaon) ग्रामीण काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर (Laxmi Hebbalkar) यांनी आयोजित केला होता. विशेष म्हणजे त्या अगोदर दोन दिवस कर्नाटक शासनातर्फे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. एकाच पुतळ्याचे दोन वेळा मोठ्या प्रमाणात अनावरण होण्याची ही पहिलीच घटना आहे.


दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होण्याला राजकीय वादाची किनार आहे. भाजपचे गोकाक येथील आमदार रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीण काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात विस्तव जात नाही. जाहीर कार्यक्रमात दोन्ही आमदार एकमेकावर टीका करण्याची संधी दवडत नाहीत. दोघेही एकमेकांना आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. 


जारकीहोळी यांनी पुतळ्याचा शासकीय अनावरण कार्यक्रम उरकला


राजहंसगड किल्ला हा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मतदारसंघाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातूची भव्यदिव्य मूर्ती किल्ल्यावर उभारण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. असे असताना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आमदार रमेश जारकीहोळी हे हेब्बाळकर यांच्या ग्रामीण मतदारसंघातील कार्यक्रमात हजेरी लावत असून त्यांनी हेब्बाळकर यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीणचे माजी भाजप आमदार संजय पाटील यांच्या मदतीने पुतळा अनावरण कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना बोलावून पुतळ्याचा शासकीय अनावरण कार्यक्रम उरकून घेतला. 


पुतळा अनावरण कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नेते हजर


विशेष म्हणजे शासकीय अनावरण कार्यक्रम प्रसंगी पुतळ्याची रंगरंगोटी अद्याप व्हायची होती. रंगाचे साहित्य तेथेच विखुरले होते पण श्रेय वादासाठी पुतळ्याच्या रंगरंगोटी अगोदर अनावरण कार्यक्रम उरकून घेतला. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी पुतळा अनावरण कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, आमदार सतेज पाटील, लातूर ग्रामीण आमदार धीरज देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी लेसर शो, क्रॅकर शो असा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 


आमदार धीरज देशमुख यांच्यावर मराठी भाषिक नाराज


पुतळा अनावरण कार्यक्रम थाटात साजरा झाला पण आमदार धीरज देशमुख यांनी आपले भाषण जय हिंद,जय महाराष्ट्र म्हणून संपवले. त्यानंतर पुन्हा येऊन धीरज देशमुख यांनी जय बेळगाव, जय कर्नाटक म्हणून मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे मराठी भाषिक नाराज झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना २००४ मध्ये सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. आता महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न संबंधी मंत्र्यांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्रातील सगळे पक्ष सीमावासीय बांधवांच्या पाठिशी आहेत. सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात येण्याची आस धरुन बसला आहे. असे असताना आमदार धीरज देशमुख यांनी मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.


हेही पाहा


Karnataka : कर्नाटकात राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूट उंचीच्या भव्य मूर्तीचे अनावरण