Shivamurthy Murugha Sharanaru Arrest : कर्नाटकमधील (Karnatka) प्रसिद्ध लिंगायत मठाच्या महंतावर गंभीर आरोप झाले आहेत. दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याच्या आरोपात महंत शिवमूर्ती मुरुगा शरणारु यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर सत्ताधारी पक्षापासून विरोधकांनी मौन धारण केलं आहे. काही निवडक नेते भाष्य करत आहेत ते पीडितांच्या समर्थनात नाही तर आरोपी महंताच्या समर्थनार्थ उभे असल्याचं चित्र आहे.


महंत शिवमूर्ती मुरुगा शरणारु यांना अटक
पोलिसांनी महंत शिवमूर्ती मुरुगा शरणारु आणि इतर चार जणांविरुद्ध पोक्सो (POCSO), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महंत शिवमूर्ती मुरुगा शरणारु यांना अटक करण्यात आली. शरणारु हे राज्यातील प्रमुख लिंगायत मठाचे महंत आहेत. जानेवारी 2019 ते जून 2022 या कालावधीत त्याच मठात शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या 15 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.


राजकीयदृष्ट्या लिंगायत समाज किती महत्त्वाचा?
खरंतर हा संपूर्ण खेळ व्होट बँक आणि राजकारणाचा आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत समाज हा राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे या समाजातील महंतांना खास मानसन्मान मिळतो. या समुदायाचा एकूण वाटा 18 टक्के आहे. विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास हा समाजाचा 118 जागांवर थेट परिणाम होतो. राज्यातील आतापर्यंतच्या 20 पैकी 8 मुख्यमंत्री लिंगायत समाजाचे होते. त्यामुळे हे आकडे पाहिले तर बहुतांश नेत्यांनी लिंगायत मठाच्या महंतावरील बलात्कारासारख्या आरोपांबाबत मौन का बाळगलं आहे, याचा अंदाज येऊ शकतो.


अटकेनंतर कोण काय म्हणाले?
आरोपी लिंगायत मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरणारु यांच्या अटकेनंतर भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचं वक्तव्य समोर आलं आहे. त्यांनी पोलिसांच्या तपासाच्या आधीच शिवमूर्ती मुरुगा शरणारु निरपराध असल्याचं म्हटलं आहे. येडियुरप्पा म्हणाले की, "स्वामीजींविरोधात हा कट आहे. त्यांच्यावरील आरोपात कोणतंही तथ्य नाही. तपासानंतर ही बाब समोर येईल."


इतकंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं वक्तव्य देखील आरोपी संताच्या समर्थनार्थ असल्याचं दिसतं. कारण त्यांनी अल्पवयीन पीडितांना न्याय मिळवून देण्याबाबत अवाक्षरही काढलं नाही. उलट तपासाअंती सत्य समोर येईल, असं म्हणत हात वर केले. परंतु मुख्यमंत्री कोणत्या सत्याबद्दल बोलत होते, याचे संकेत जवळपास सगळ्यांनाच मिळाले.


मुरुगा मठ आणि राजकारण
शिवमूर्ती मुरुगा शरणारु हे कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात असलेल्या प्रसिद्ध मुरुगा मठाचे महंत आहेत. राजकीयदृष्ट्या या मठाला विशेष महत्त्व आहे. या मठाकडून ज्या पक्षाला समर्थन मिळतं, त्याचा थेट परिणाम निवडणुकीत पाहायला मिळतो तसंच पक्षाला याचा फायदा देखील होतो. काँग्रेस सत्तेत असताना लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आणला होता. तेव्हा या समजाचा काँग्रेसला पाठिंबा मिळाला होता. तर मागील महिन्यातच शिवमूर्ती मुरुगा शरणारु यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दीक्षाही दिली होती.


सध्या या प्रकरणात पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे आणि वैद्यकीय चाचणी देखील केली आहे. महंतांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे कारण दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्यामुळे राजकारणी आरोपी महंताच्या बाजूने उभे राहिल्याचं चित्र असताना पीडित मुलींना न्याय मिळणार की नाही हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या


Shivamurthy Sharanaru Arrested : कर्नाटकातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना अटक, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप  


Lingayat Saint Shivamurthy Muruga : लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा, दोन अल्पवयीन मुलींचं शोषण केल्याचा आरोप