कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचं महिलेशी असभ्य वर्तन
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2019 11:37 PM (IST)
ती महिला सिद्धरामय्या यांच्याकडे त्यांच्या आमदार पुत्राची तक्रार करण्यासाठी आली होती, असं सांगितलं जात आहे. यावेळी त्यांनी या महिलेशी असभ्य वर्तन केलं. मात्र सिद्धरामय्या यांची काही चूक नव्हती असं त्या महिलेनं प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं.
बंगळूरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ती महिला सिद्धरामय्या यांच्याकडे त्यांच्या आमदार पुत्राची तक्रार करण्यासाठी आली होती, असं सांगितलं जात आहे. यावेळी त्यांनी या महिलेशी असभ्य वर्तन केलं. मात्र सिद्धरामय्या यांची काही चूक नव्हती असं त्या महिलेनं प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं. म्हैसूरमधील एका कार्यक्रमादरम्यान एका महिलेनं बोलायला सुरुवात केली. तिने सिद्धरामय्या यांच्या मुलाची तक्रार करताच सिद्धरामय्या यांचा पारा चढला आणि त्यांनी महिलेच्या हातातील माईक हिसकावून घेतला. यावेळी त्यांनी संबंधित महिलेशी असभ्य वर्तन केले आणि तिच्यावर ओरडत खाली बसायला सांगितलं. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून, आता सिद्धरामय्या यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. शिवाय महिला आयोगानेही या प्रकाराबाबत सिद्धरामय्या यांच्याविरोधात नोटीस बजावली असून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले. झालेला प्रकार हा अनवधानाने घडला : सिद्धरामय्या त्या महिला माझ्या बहिणीसारखी आहे. त्यांचं भाषण लांबल्याने मी त्यांना बसायला सांगितलं. माझा त्यांच्याशी असभ्य वर्तन करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्या महिलेला मी मागील 15 वर्षांपासून ओळखतो. झालेला प्रकार हा अनवधानाने घडला आहे, असं स्पष्टीकरण सिद्धरामय्या यांनी दिलं आहे. सिद्धरामय्या यांची चूक नाही : महिला तसेच संबंधित महिलेला घडलेल्या प्रकाराबाबत विचारलं असता, तिने सिद्धरामय्या यांची काही चूक नव्हती असं सांगितलं आहे. सिद्धरामय्या हे एक चांगले मुख्यमंत्री होते. मी एका माजी मुख्यमंत्र्यांशी अशा प्रकारे बोलायला नको होतं. माझीच चूक होती, मी त्यांच्या समोरील टेबलवर हात मारला, जे चुकीचं होतं, असं त्या महिलेनं सांगितलं.