Karnataka Elections Survey 2023: बजरंग दलाचा वाद हा कर्नाटक निवडणुकीचा (Karnataka Elections 2023) सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. सध्या कर्नाटकातील मंदिरांमध्ये भाजप (BJP) कार्यकर्ते हनुमान चालिसाचे पठण (Hanuman Chalisa) करत आहेत. भजन कीर्तन होत आहे. बजरंग दलाचा (Bajrang Dal) वाद बजरंगबलीशी जोडून भाजपनं काँग्रेसला बॅकफूटवर ठेवले आहे. काँग्रेसचे अनेक नेते आणि मित्रपक्षांचं यामुळे टेन्शन वाढलं आहे.  


काँग्रेसनं आपल्या कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपनं संधी साधत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील हाच मुद्दा हेरत तो निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं कर्नाटकमध्ये या विषयावर एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात बजरंग दलाच्या वादाबाबत जनतेचा कौल काय? बंदी घालावी की, नाही? यावर लोकांची मतं जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणात 8 हजार 272 लोकांशी संवाद साधण्यात आला. गुरुवारी (4 मे) दिवसभर हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणातील त्रुटींचे मार्जिन ऑफ एरर प्लस माइनस 3 ते प्लस माइनस 5 टक्के आहे. 


बजरंद दल आणि बंदी असलेल्या PFI ची तुलना योग्य? 


स्रोत : सी व्होटर



  • हो : 35 टक्के 

  • नाही : 38 टक्के 

  • माहित नाही : 27 टक्के 


सर्वेक्षणात 35 टक्के लोकांना असं वाटतंय की, बजरंग दलाची तुलना देशात बंदी असलेल्या पीएफआय संघटनेशी करणं योग्य आहे. तसेच, 38 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ही तुलना योग्य नाही. तर 27 टक्के लोक आहेत ज्यांना ही तुलना योग्य आहे की नाही हे  माहित नाही. 


ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं बांधणार


या प्रकरणापूर्वी कर्नाटकात फ्रंटफुटवर खेळणारी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी गुरुवारी (4 मे) सांगितलं की, आमचं सरकार आल्यानंतर विविध ठिकाणी हनुमानाची मंदिरं बांधली जातील. यासोबतच हनुमंताचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. 


काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?


काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे की, "कायदा आणि संविधान पवित्र आहे, असं आमचं मत आहे. कोणतीही व्यक्ती किंवा बजरंग दल, पीएफआय आणि इतर संघटना जे द्वेष आणि शत्रुत्व पसरवतात, मग ते बहुसंख्य असोत वा अल्पसंख्याक, ते कायदा आणि संविधानाचं उल्लंघन करू शकत नाहीत. आम्ही अशा संघटनांवर कायद्यानुसार बंदी घालण्यासह निर्णायक कारवाई करू."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Karnataka Election Survey: बेरोजगारी, गरीबी, टीपू सुल्तान.... कर्नाटक निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा कोणता? सर्वेक्षणातून खुलासा