Karnataka Election : भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता, पण काँग्रेसने आता त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचं निश्चित केलं आहे. काँग्रेसने जगदीश शेट्टर यांच्यासोबतच तिप्पनप्पा कमकानूर (Tippannappa Kamaknoor) आणि एन.एस. बोसेराजू (N.S. Boseraju) यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने सोमवारी (19 जून) एक निवेदन जारी केलं असून त्यात म्हटलं आहे की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जगदीश शेट्टर, तिप्पनप्पा कमकानूर आणि एन.एस. बोसेराजू यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
शेट्टर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव
कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. भाजपने त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यास नकार दिला, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जगदीश शेट्टर यांचा जरी पराभव झाला असला तरी त्यांच्यामुळे काँग्रेसने भाजपच्या लिंगायत समाजाच्या मतपेटीला खिंडार पाडल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांच्यामुळे उत्तर कर्नाटकातील जवळपास 30 ते 35 जागांवर थेट परिणाम झाल्याचं बोललं जातंय.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने 224 पैकी 135 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 66 जागा मिळाल्या होत्या. तर एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएसला 19 जागा मिळाल्या आहेत.
कर्नाटक विधान परिषदेच्या पोटनिवडणुका का होत आहेत?
कर्नाटक विधान परिषदेच्या तीन जागांसाठी 30 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक लढविलेल्या (बाबुराव चिंचनसूर, आर शंकर आणि लक्ष्मण सवदी) सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. बाबुराव चिंचनसूर, आर शंकर आणि लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवली.
मात्र यापैकी केवळ लक्ष्मण सवदी यांनीच निवडणूक जिंकली, तर अन्य दोन नेत्यांचा पराभव झाला. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. यामध्ये विधानसभेचे सदस्य मतदान करणार आहेत.
लक्ष्मण सवदी यांना मंत्रीपद नाही
भाजपच्या लिंगायत व्होट बँकेला खिंडार पाडून ती मतं काँग्रेसकडे खेचून आणण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या लक्ष्मण (Laxman Savadi) यांना काँग्रेसने मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. कर्नाटकातील 24 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यामध्ये लिंगायत समाजातील मोठे नेते असलेल्या लक्ष्मण सवदी यांचा समावेश करण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.