Lok Sabha Election Latest Update: अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची (Ayodhya Ram Mandir) तारीख जाहीर करण्यात आली आहे. 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या दरम्यान राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर म्हणजे 25 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना हे मंदिर खुलं होण्याची शक्यता आहे. पण श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या तारखेवर लक्ष दिलं तर त्यामध्ये राजकारण दडल्याचं लक्षात येतंय. म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा आहे. 


पाच राज्यांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात


देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच रांज्यांच्या विधानसभा निवडणुका (assembly election) येत्या डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. त्यामुळे मिनी लोकसभा निवडणूक समजल्या जाणाऱ्या या पाच राज्यांच्या निवडणुकांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. यापैकी मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे, तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणामध्ये बीआरएस आणि मिझोराममध्ये मिझोराम नॅशनल फ्रन्ट सत्तेत आहे. या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 75 जागा येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचा थेट परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहे. विधानसभेत ज्या पक्षाला कौल त्याच पक्षाला लोकसभेसाठी कौल मिळण्याची अधिक शक्यता, कारण या दोन निवडणुकींच्या दरम्यानचा काळ हा अवघा तीन ते चार महिन्यांचा असेल. 


या राज्याच्या निवडणुकीच्या तारखा या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा होण्याच्या आधी होणार आहेत. त्यामुळे याचा लाभ भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना भाजपला याचा राजकीय फायदाच अधिक मिळण्याची शक्यता आहे. 


Ayodhya Ram Mandir : लोकसभेच्या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा 


राम मंदिराच्या निर्माणाचा मुद्दा हा भाजपच्या सुरुवातीपासून अजेंड्यावर असल्याचं दिसतंय. केंद्रात 2019 साली दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने राम मंदिराच्या निर्माणाची घोषणा केली. या मंदिराच्या बांधकामाचा दुसरा टप्पा हा या वर्षीच्या अखेरपर्यंत म्हणजे 30 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 24-25 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये असणार आहेत. 


योगायोग म्हणजे त्याच वर्षी एप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचे पडघम हे आतापासूनच वाजायला सुरुवात झाले असून डिसेंबर-जानेवारीमध्ये त्यामध्ये अधिक रंगत येण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकार एक प्रकारचा प्रचारच करण्याची अधिक शक्यता आहे. राम मंदिराचा निर्माणाचा मुद्दा हा भाजपच्या प्रचाराचा मुद्दा असणार हे स्पष्ट आहे. 


कर्नाटकात भाजपला बजरंगबली पावला नाही, पण राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम विधानसभेच्या आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला राम पावणार का हे पहावं लागेल. 


या बातम्या वाचा: