Karnataka Election 2023 : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. "काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं," असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरगे बोलत होते. कर्नाटक निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी या मुद्द्यावर लढली जाणार नसून राज्याच्या मुद्द्यांवर लढली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. राज्यात सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसने आपलं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटक निवडणुकीवर भाष्य केले.


'कर्नाटक निवडणूक राहुल विरुद्ध मोदी नाही'


"पंतप्रधान मोदी सगळीकडे पोहोचतात, मला बघा म्हणतात. मी तुम्हाला का भेटू? महापालिकेतही पाहतो, महापालिकेतही पाहतो, विधानसभा निवडणुकीतही पाहतो, संसदेतही पाहतो. अरे कितीतरी जागी तुम्हालाच बघायचं," असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला. काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, "इथल्या लोकांना पंतप्रधान मोदींचा पक्ष आणि त्यांचे कार्यक्रम आवडत नाहीत."


कर्नाटक निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढणार का? या प्रश्नावर खरगे म्हणाले की, आम्ही 2024 मध्ये लढू. कर्नाटकची निवडणूक राज्याच्या मुद्द्यांवर लढवली जाईल. भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, नंदिनी या मुद्द्यांवर असेल.


आम्ही 70 वर्षात लोकशाही वाचवली : खरगे


भाजपवर निशाणा साधत खरगे यांनी काँग्रेसच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की आज जेव्हा एखादी ट्रेन सुरु होते तेव्हा पंतप्रधान तिला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पोहोचतात. खरगेंनी भाजपवर काँग्रेसच्या योजनांचे नामांतर करुन उद्घाटन केल्याचा आरोप केला आहे. तसंच अशा छोट्या गोष्टींवर दावा करु नका, असंही त्यांनी सांगितलं. मोठ्या गोष्टी करा, जशा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पंचवार्षिक योजना होत्या. त्यांनी बंगळुरुला एचएएल, बीईएल, टेलिफोन उद्योग, आयटी अशा मोठ्या गोष्टी दिल्या.


ते म्हणाले की, "बंगळुरु हे सार्वजनिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध होतं. तुम्ही सार्वजनिक क्षेत्र विकून खात आहात आणि तुम्ही आम्हाला विचारता की आम्ही 70 वर्षात काय केलं, मग आम्ही 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं."


काँग्रेसला बहुमत मिळेल, खरगे यांना विश्वास


कर्नाटकात काँग्रेससाठी ही करो या मरोची लढाई आहे का, या प्रश्नावर खरगे म्हणाले की, "आमच्यासाठी फक्त करोची लढाई आणि मरोची लढाई नाही. आम्ही चांगली कामगिरी करु. आम्ही आमचं लक्ष्य साध्य करु. काँग्रेसला बहुमत मिळेल आणि पक्षाला जास्त जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, अनेक वेळा आमचे आमदार चोरीला जातात. अशा परिस्थितीत जास्त संख्या असणं आवश्यक आहे.