नवी दिल्ली : कर्नाटकमधील राजकारणात रोज नवी खलबतं होत आहेत. राजीनामे स्वीकारले जावे, अशी मागणी घेऊन आणखी पाच आमदार आज सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत. रोशन बेग, एमटीबी नागराज, आनंद सिंह, सुधाकर राव आणि मुनिरत्ना यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे आमदारांनी मागणी केली आहे की, सुप्रीम कोर्टाने कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना आमचे राजीनामे स्वीकारण्याचे निर्देश द्यावेत. तर दुसऱ्या बाजुला काँग्रेस नेते डीके शिवकुमार बंडखोर आमदारांची समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहेत.


शिवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही (मी आणि काँग्रेसचे बंडखोरांसह सर्व आमदार )गेली 40 वर्ष एकत्र आहोत. आम्ही कायम एकत्र राहणार आणि एकत्र मरणार. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. सर्व काही विसरुन आम्ही एकत्र पुढे जाणार आहोत. एमटीबी नागराज (बंडखोर आमदार) यांच्याशी माझे बोलणे झाले. ते पक्षात राहण्यासाठी तयार झाले आहेत.


त्यानंतर एमटीबी नागराज यांनीदेखील माध्यमांशी बोलताना काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सूचक विधान केले आहे. नागराज म्हणाले की, मी राजीनामा दिला आहे. परंतु आज डीके शिवकुमार आणि इतर नेते माझ्याकडे आले. त्यांनी मला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मी सुधाकर राव यांच्याशी बोलल्यानंतर पुढील निर्णय घेईन. मी काँग्रेसमध्ये अनेक दशकं घालवली आहेत.