नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे नेतृत्व बदल होत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं.
प्रदेशाध्यक्ष पदासोबत चार कार्याध्यक्ष नेमले जाणार आहेत. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, बसवराज पाटील कार्याध्यक्ष असणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या या नियुक्त्या लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कार्याध्यक्ष नेमणूक करताना प्रादेशिक संतुलनही सांभाळण्यात आलं आहे. नितीन राऊत, यशोमती ठाकूर हे विदर्भातील नेते आहेत, विश्वजीत कदम पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, तर बसवराज पाटील मराठवाड्यातील नेते आहेत.
नाना पटोले यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद दिले जाणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. काँग्रेसला राज्यात केवळ एका जागी विजय मिळाला होता. राज्यातील या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. अनेक मोठे नेते, आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यात पक्षनेतृत्व बदलाची गरज होती तशी चर्चाही गेल्या काही दिवसांपासून होती. त्यामुळे राज्यात काँग्रेसने नव्याने पक्ष बांधणी केल्याचं समजत आहे.