बंगळुरु : विविध मागण्या घेऊन आलेल्या नागरिकांना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखला होता. त्यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटलं की, मतदानावेळी मोदींना मतदान केलं  आणि आता कामासाठी माझ्याकडे कशाला आले?" तसेच मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी आंदोलकांना लाठिचार्ज करण्याची धमकीही दिली.


येरमरुस थर्मल पॉवर स्टेशनचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते. "तुम्ही नरेंद्र मोदींना मतदान केलं आणि आता मी तुमची कामं करावी अशी अपेक्षा ठेवता. तसेच मी तुमचा आदर करु अशीही तुमची इच्छा आहे? तुम्ही माझा ताफा रोखला, तुमच्यावर लाठिचार्ज करायल हवा, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं. आंदोलनकर्त्यांवर रागावून मुख्यमंत्री काही वेळात तेथून निघून गेले. मात्र मुख्यमंत्र्यांचा हे रुप पाहून आंदोलनकर्ते चकीत झाले.





आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र त्यांनी रास्तारोको केला, त्यामुळे मला राग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा रोखला, तर कोणी त्याचं समर्थन करेल का? असा सवालही कुमारस्वामी यांनी उपस्थित केला.


या घटनेवरून विरोधकांनी कुमारस्वामी यांना टार्गेट केलं. भाजपचे प्रवक्ते रवीकुमार यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री कुमारस्वामी कदाचित विसरले आहेत की ते केवळ जेडीएसचे नाही, तर कर्नाटकच्या 6.5 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत.