Praveen Nettaru News : कर्नाटक सरकारचा आज एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज वर्षपूर्तीनिमित्त होणारा कार्यक्रम रद्द केला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा केली आहे. भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने भाजपनं हा निर्णय घेतला आहे. भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं की, 'सरकारच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जनोत्सव असं नाव देण्यात आलं होतं. पण सरकारने आता हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.' उत्सवाऐवजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पत्रकार परिषदेद्वारे जनतेला संबोधित करणार आहेत.


काय आहे प्रकरण?


प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचं दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे भागात पोल्ट्रीचं दुकान होतं. गेल्या मंगळवारी प्रवीण दुकान बंद करून घरी परतत असताना काही दुचाकीस्वारांनी त्याचा मार्ग अडवून प्रवीणवर कुऱ्हाडीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं.


'या' कारणामुळे प्रवीणची हत्या?
प्रवीणने 29 जून रोजी उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या हत्येचा निषेध करत फेसबुक पोस्ट केली होती. प्रवीणने लिहिलं होतं की, 'राष्ट्रवादी विचारसरणीचे समर्थन केल्याबद्दल एका टेलरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आणि याचा व्हिडिओही बनवण्यात आला. विरोधी पक्षांवर सवाल करताना प्रवीणने लिहिलं की, आता यावर कोणी का बोलत नाही?'


'दोषींवर लवकरच कारवाई होईल'


मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणातील सर्व दोषींना लवकरच पकडण्यात येईल. आज बंगळुरूपासून सुमारे 40 किमी दूर असलेल्या डोड्डाबल्लापुरामध्ये एक मेगा रॅली आयोजित करण्यात येणार होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, आता भाजप नेत्याच्या हत्येनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.