बंगळुरु : 'कॅफे कॉफी डे'चे मालक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई व्ही जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. जवळपास 36 तासांनंतर मंगळुरु येथील नेत्रावती नदीत सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. काही वेळात सिद्धार्थ यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.
सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता होते. पोलीस त्यांचा गेल्या 24 तासांपासून शोध घेत होते. काल पोलिसांनी नेत्रावती नदीजवळील परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यासाठी जवळपास 200 हून अधिक पोलीस, शोधपथक आणि 25 बोटींची मदत घेण्यात आली.
सोमवारी सिद्धार्थ आपल्या गाडीने चिक्कमगलुरु येथे गेल होते. तेथून त्यांना केरळ येथे जायचे होते. मात्र मंगळुरुजवळ नेत्रावती नदीच्या पुलाजवळ त्यांनी आपली गाडी ड्रायव्हरला थांबवायला सांगितली आणि खाली उतरले. त्यावेळी सिद्धार्थ फोनवर कुणाशी तरी बोलत होते, अशी माहिती त्यांच्या ड्रायव्हरने दिली.
त्यानंतर ड्रायव्हरने सिद्धार्थ यांची जवळपास अर्धा तास वाट पाहिली, मात्र ते आलेच नाहीत. त्यानंतर ड्रायव्हरने त्यांना फोन केला तर त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यांनंतर ड्रायव्हरने लगेचच सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली.