Karnataka Bandh Over Cauvery Water Dispute: कावेरीचे पाणी (Cauvery River) तामिळनाडूला (Tamil Nadu) सोडल्याच्या निषेधार्थ कन्नड समर्थक आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (29 सप्टेंबर) कर्नाटक बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (26 सप्टेंबर) शहर बंद होते त्यामुळे बंगळुरूमधील हा दुसरा संप आहे..
कर्नाटक रक्षण वेदिके, कन्नड चालुवली (वताल पक्ष) आणि 'कन्नड ओक्कुटा' या प्रमुख संघटनांसह विविध शेतकरी संघटनांनी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. बंगळुरू पोलिसांनी शहरात कोणत्याही प्रकारच्या बंदला परवानगी दिलेली नाही आणि सभांवर बंदीसह कलम 144 लागू होण्याची शक्यता आहे. बंगळूरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडल्याच्या निषेधार्थ 29 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील अनेक संघटना राज्यव्यापी बंदसाठी एकत्र आल्या आहेत.
सार्वजनिक मालमत्तेचे काही नुकसान झाल्यास संघटना जबाबदार
पोलीस आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भर दिला की कोणत्याही प्रकारच्या बंदला बंदी आहे. आंदोलने, निदर्शने करायचे असेल तर फ्रीडम पार्क येथे करण्यात येणार आहे . कोणतीही संघटना बळजबरीने नव्हे तर स्वबळावर पाठिंबा देऊ शकते. सार्वजनिक मालमत्तेचे काही नुकसान झाल्यास संबंधित संघटना जबाबदार राहतील.
राज्य परिवहन महामंडळांनी सेवा नेहमीप्रमाणे सुरू
बंदला ऑटोरिक्षा ड्रायव्हर्स युनियन आणि ओला उबर ड्रायव्हर्स अँड ओनर्स असोसिएशन (OUDOA) यांचा पाठिंबा आहे. ओला उबेर ड्रायव्हर्स अँड ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष तनवीर पाशा यांनी सांगितले की, नयंदहल्ली ते फ्रीडम पार्क अशी रॅली काढण्यात येणार आहे. कर्नाटक स्टेट प्रायव्हेट स्कूल असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या संघटनेचा बंदला पाठिंबा आहे. शाळा बंद राहण्याची शक्यता असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. ग्रेटर बेंगळुरू हॉटेल असोसिएशनने बंदला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळांनी सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याच्या सूचना राज्य परिवहन विभागाने दिल्या आहेत.
शॉपिंग मॉल्स आणि चित्रपटगृहे बंद
राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स आणि चित्रपटगृहे बंद राहतील. त्यांनी यापूर्वीच कर्नाटक बंदला पाठिंबा दिला आहे. सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका कोणत्याही बदलाशिवाय त्यांच्या वेळेत उघडणार आहेत. त्याच वेळी, सर्व आपत्कालीन सेवेशी संबंधित वाहने जसे की रुग्णवाहिका, फार्मा वाहने आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंची वाहतूक करणारी वाहने सुरू राहतील. रुग्णालये आणि वैद्यकीय दुकानेही सुरू राहणार आहे. कर्नाटकातील उत्तरेकडील बेल्लारी, कलबुर्गी, बिदर, बागलकोट, विजयपुरा, यादगीर, हुबळी-धारवाड, गदग, हावेरी, कोप्पल आणि दावणगेरे या भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे, परंतु ते म्हणाले की ते त्यांचे व्यवसाय बंद ठेवणार नाहीत.
दरम्यान, कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात गुरुवारी मांड्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. गेल्या 15 दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत. राज्य सरकार तामिळनाडूबाबत उदासीन आहे आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.