बंगळुरु : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे बी एस येडियुरप्पा हे भारताच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद भूषवणारे नेते ठरले आहेत. येडियुरप्पा हे 55 तासांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.


येडियुरप्पा यांनी 17 मे 2018 रोजी सकाळी 9 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 19 मे 2018 रोजी त्यांनी कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यापूर्वी पदाचा राजीनामा दिला.

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे.
येडियुरप्पांचा राजीनामा, कर्नाटकात भाजपचं सरकार कोसळलं

यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जगदंबिका पाल हे सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री ठरले होते. जगदंबिका पाल यांनी 21 फेब्रुवारी 1998 ते 23 फेब्रुवारी 1998 असे तीन दिवस यूपीचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं.

यूपीचे तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याण सिंग यांचं सरकार बरखास्त केलं होतं. कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर राज्यपालांनी जगदंबिका पाल यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. मात्र अलाहाबाद कोर्टाने कल्याण सिंग सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. कल्याण सिंग यांनी सदनात यशस्वीपणे बहुमत सिद्ध केलं आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली.

सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री

येडियुरप्पा (कर्नाटक) - 55 तास (सव्वा दोन दिवस)
जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) - तीन दिवस
सतीश प्रसाद सिंग (बिहार) - पाच दिवस
जानकी रामचंद्रन (तामिळनाडू) - 24 दिवस
बी पी मंडल (बिहार) - 31 दिवस
एन भास्कर राव (आंध्र प्रदेश) -  31 दिवस
सी एच मोहम्मद कोया (केरळ) - 45 दिवस.

संबंधित बातमी :