Giriraj Singh On Godse:  महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा भारताचे सुपुत्र असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले होते. त्यांच्या या  वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी गिरीराज यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. सिब्बल म्हणाले की, गिरीराज यांच्या वक्तव्यावरून सरकारचा हेतू स्पष्ट होतो. पंतप्रधान मोदी या वक्तव्याचा निषेध करायला हवा, असेही सिब्बल यांनी म्हटले. 


सिब्बल यांनी म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वातंत्र्यांच्या लढाईत सहभागी नव्हती. संघाचा विचार हाच भाजपचा विचार आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलेले वक्तव्य हे सरकारची भूमिका, इच्छा काय आहे, हे दर्शवते. अशा प्रकारे विरोध करणे हा महात्मा गांधी यांच्या आचरणाविरोधात आहे. जर, महात्मा गांधी यांचा मारेकरी देशाचा सुपुत्र असेल तर निर्भयावर अत्याचार करणारे, तिचे मारेकरीदेखील देशाचे सुपुत्र आहेत. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधींच्या मार्गावर चालत असल्याचे म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याला देशाचा सुपुत्र म्हणत आहेत. 


पंतप्रधान मोदींनी वक्तव्याचा निषेध करावा, पण ते करणार नाहीत


सिब्बल पुढे म्हणाले, खुनी कधीही देशाचा सुपुत्र होऊ शकत नाही. खुन्यात धर्म पाहू नये. हाच का सबका साथ आणि सबका विकास? असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी किमान टीका करावी, पण ते असं काही करतील याचा विश्वास आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 


गिरीराज सिंह काय म्हणाले होते?


केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी शुक्रवारी (9 जून) छत्तीसगडमध्ये नथुराम गोडसेबाबत वक्तव्य केले होते. त्यांनी गोडसेला भारतमातेचा पुत्र असल्याचे म्हटले होते. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार,  गांधींचा मारेकरी असेल तरी गोडसे हा  भारतमातेचा सुपुत्र आहे. तो भारतात जन्माला आला, औरंगजेब आणि बाबरसारखा आक्रमक नाही, ज्याला बाबरचा मुलगा, वारस असल्याचा अभिमान आहे, तो भारतमातेचा सुपुत्र असू शकत नाही, असे सिंह यांनी म्हटले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: