नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाला हादरवून सोडणारी एक बातमी राजधानी दिल्लीतून समोर आली आहे. या भूकंपाचं केंद्रबिंदू आहे दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.
अरविंद केजरीवाल यांनी 'आप' नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला आहे.
50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पेसै दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवालांच्या एका नातेवाईकासाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा मिश्रांनी केला आहे.
जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये देताना मी स्वत: पाहिलं, त्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, असंही कपिल मिश्रा म्हणाले. दिल्लीच्या जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रिपदावरुन कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मिश्रा हे कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात.
भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या प्रतिमेला कपिल मिश्रांच्या आरोपाने धक्का लागला आहे. एकूणच आम आदमी पक्षातला अंतर्गत कलह वारंवार समोर येताना दिसत आहे.