जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एका पोलिसासह तीन नागरिकांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2017 07:24 AM (IST)
फाईल फोटो
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. मीर बाजार येथे पोलिसांच्या पथकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद तर 3 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दहशतवादी फैयाज अहमद उर्फ सेठाला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. सेठा हा दहशतवादी 2015 पासून फरार होता. मीर बाजार येथे पोलिसांचं गस्ती पथक आलं असताना दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर पोलिसांकडून देण्यात आलं, यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. फेब्रुवारीत दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर दोन जवान शहीद झाले होते. काश्मीरमधील कुलगाम हा भाग नेहमीच दहशतवाद्यांचं लक्ष्य राहिलेला आहे. काश्मीरच्या यारीपोरा भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत सैन्य दलानं चोख प्रत्यूत्तर दिलं होतं.