कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना दक्षिण कोरियाचा हुकुमशहा किम जोंगशी करणाऱ्या, कानपूरच्या 23 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यापाऱ्यांनी मोदींची किमशी तुलना करणारे बॅनर आणि होर्डिंग्ज संपूर्ण कानपूर शहरात लावले होते.


कानपूरच्या अनेक बँकांमध्ये 10 रुपयांची नाणी स्विकारण्यात येत नाही आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी कानपूरच्या अनेक बाजारात मोदींची किम जोंगशी तुलना करणारे होर्डिंग्ज  लावण्यात आले.

या होर्डिंग्जवर एका बाजूला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किमचा फोटो लावण्यात आला आहे. त्याखाली, मी संपूर्ण जगाला संपवून टाकेन अशी ओळ आहे. तर दुसऱ्या बाजूला मोदींचा फोटो लावण्यात आला असून, त्याखाली मी व्यापाऱ्यांना संपवून टाकेन, अशी ओळ लिहिली आहे.

हा प्रकार समोर येताच स्थानिक पोलिसांनी होर्डिंग लावणाऱ्या एकूण 23 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी एकाला अटकही केली आहे.

एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव प्रवीणकुमार आहे. पोलीस अधीक्षक अशोक वर्मा यांनी अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. मोदींचे हे वादग्रस्त पोस्टर लावताना प्रवीणकुमारला अटक करण्यात आली.