मुंबई: आपल्या देशात कोणत्याही निवडणुका असोत, तो एक उत्सवच असतो. त्यातल्या त्यात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तर मग काय बोलायलाच नको. त्या निवडणुका जिंकण्यासाठी उमेदवार कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. आपल्या निवडणुकीच्या प्रचारात रशियन मुलींच्या डान्सला परवानगी द्यावी, तसेच दारु वाटपाचीही परवानगी मिळावी यासाठी कानपूरमधील एका उमेदवाराने चक्क निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. हे पक्ष सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. संजय दुबे असं या उमेदवाराचं नाव आहे.
उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा उत्साह जोरात आहे आणि सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पक्षासोबत अपक्ष उमेदवारांनीही त्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. मतदारांना खूश कसं करायचं? मग त्यासाठी कायदा आणि नियम धाब्यावर बसवले तरी चालतील अशी भूमिका उमेदवारांनी घेतल्याचं दिसून येतंय.
कानपूरमधील आंबेडकर नगरमधील एका उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून अशी परवानगी मागितली आहे. आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये रशिनय मुलींना नाचवायचं आहे, तसेच लोकांना दारूही वाटायची आहे, त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत या उमेदवारांना चक्क निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.
उमेदवाराच्या व्हायरल झालेल्या पत्रात असे लिहिले आहे की अर्जदाराला रात्रीच्या वेळी रशियन नृत्यांगना (20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या परदेशी मुली) आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूची व्यवस्था करायची आहे. कृपया अर्जदारास परवानगी द्या. व्हायरल झालेल्या पत्रात 01 मे 2023 ही तारीख नमूद करण्यात आली आहे.
कानपुरातील काकदेव आंबेडकर नगर वॉर्ड-30 ही अनारक्षित जागा आहे. आंबेडकरनगरचे रहिवासी संजय दुबे हे प्रभाग 30 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. संजय दुबे हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह पेन्सिल आहे. नगरसेवकपदाचे उमेदवार संजय दुबे हे चर्चेत आहेत. प्रभागात भाजप, काँग्रेस, बसपाने नगरसेवक उमेदवार उभे केले आहेत. राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात पूर्ण ताकद लावत आहेत.
निवडणूक प्रचारामध्ये रशियन तरुणी नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल
एकीकडे या उमेदवाराचं पत्र व्हायरल होत असताना दुसरीकडे एका ठिकाणी प्रचारामध्ये रशियन तरुणी नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कानपुरातील काकदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरनगरचा असल्याचं सांगितलं जातंय. हा डान्स सुरू असताना त्या ठिकाणी पोलिस आले आणि कारवाई केली.