बंगळुरु : कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक चिरंजीवी सरजा याचं आज दुपारी निधन झालं. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी चिरंजीवी सरजाचं निधन झालं. त्याच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीवीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनंतर त्याला बंगळुरु येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने चिरंजीवी सरजाचं निधन झालं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिरंजीवी सरजाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र हृदयविकाराचा झटक्याने त्याचं निधन झालं. चिरंजीवीच्या निधनाची माहिती मिळताच कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चिरंजीवीचं पार्थिव बसवनगुडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून सोमवारी अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
चिरंजीवी सरजाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दिली सुरुवात केली होती. अभिनेता म्हणून 2009 मध्ये आलेला 'वायुपूत्र' सिनेमा त्याच्या कारकिर्दितला पहिला सिनेमा होता. त्याने 20 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला होता. दक्षिण सिनेसृष्टीतील स्टार अर्जुन सरजाचा पुतण्या आणि अॅक्शन राजकुमार ध्रुव सरजाचा चिरंजीवी सरजा भाऊ होता.
चिरंजीवी सरजाने चंद्रलेखा, औतार, भारजारी, सेजियर, अम्मा आय लव्ह यू, सिंजंगा इत्यादी सिनेमांमध्ये अभिनय केला होता. शिवार्जुन हा चिरंजीवी सरजाचा शेवटचा सिनेमा ठरला.